पुढील काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० % हुन अधिक असेल : राज्यपाल !

मुंबई, दि. २१ : भारतात महिलांनी हजारो वर्षे अन्याय व कष्ट सहन केले. परंतु काळ बदलला असून आज महिला अंतराळवीर,  वैमानिक, सैन्य दलातील अधिकारी झाल्या आहेत. आगामी काळात भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, महसूल सेवा आदी भारतीय सेवांमध्ये महिलांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक असेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  व्यक्त केला.

समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘स्त्री शक्ती सन्मान’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  ‘अभियान’ या सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मातृशक्तीचे जीवनात फार मोठे स्थान असल्याचे नमूद करून महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रे तसेच अर्थविषयक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला लेखिका लिखाण करताना दिसतात, ही आपल्याकरिता सुखद बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या नफिसा हुसैन, समाजसेविका व माजी सरपंच देवकी डोईफोडे, धावपटू मैथीली अगस्ती,  दिव्यांग जलतरणपटू जिया राय, महिला उद्योजिका स्वाती सिंह, साप्ताहिक विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव, हिंदी साहित्यिक डॉ. भारती गोरे व पार्श्वगायिका रीवा राठौड यांना स्त्री शक्ती सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, उद्योजक विनीत मित्तल व ‘अभियान’चे अध्यक्ष अमरजीत मिश्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *