मुंबई, दि.२५:- विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत. सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ १८ ते २१ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने १ लाख १८६ इतक्या मतदान केंद्रासाठी २ लाख २१ हजार ६०० बॅलेट युनिट (२२१ %) १ लाख २१ हजार ८८६ कंट्रोल युनिट (१२२ %) व १ लाख ३२ हजार ९४ व्हीव्हीपॅट (१३२ %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी ५ हजार १६६ बॅलेट युनिट, ५ हजार १६६ कंट्रोल युनिट व ५ हजार १६५ व्हीव्हीपॅट इतक्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान मुंबई उच्च न्यायालय, व विविध खंडपीठासमोर १४ लोकसभा मतदारसंघात १६ निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सदरहू १६ याचिकांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात ५६ हजार २०० बीयु व २८ हजार ४०८ सीयु मशीन्स न्यायालयीन प्रकरणामुळे सीलबंद होत्या. सद्यस्थितीत प्रस्तुत १६ निवडणूक याचिकांपैकी ७ निवडणूक याचिकांमधील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्स उच्च न्यायालयाने मुक्त केल्या आहेत. त्यामध्ये २३ हजार ७३१ बीयु व १२ हजार ३०७ सीयु मशीन्सचा समावेश आहे.