मुंबई प्रतिनिधि, दि २७ : तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येतील. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये व्यवस्थापनांना नवीन शैक्षणिक संस्था सुरु करण्याच्या परवानगीसाठी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मंडळाच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. असे अर्ज शासनाकडे दि. १० ऑक्टोबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठविण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ज्या व्यवस्थापनांना नवीन पाठयक्रम, जादा विद्याशाखा, नवीन विषय आणि ज्यादा तुकड्या सुरु करण्यासंबंधी परवानगीसाठी दि. १५ सप्टेंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करता येतील. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये संस्था बंद करु इच्छिणारे व्यवस्थापन विहित नमुन्यात दि. १५ सप्टेंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी मंडळाकडे अर्ज करता येतील.