व्यवसायासाठी साधने देऊन रोजगार निर्मिती होणार.
बुलडाणा, दि.2 : महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत मंजूर दिव्यांग महिला व कुटुंबीय सदस्यांकरिता ” ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्र” चे वितरण आज 1 जुलै रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ट्राय साकलच्या चावीचे वितरण करण्यात आले. तसेच फित कापून फिरत्या विक्री केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुमेध तायडे आदी उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रा द्वारे बचत गटातील दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सदर ट्राय सायकलचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण 162 दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्मित होणार असून महाराष्ट्र राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणाद्वारे या उपक्रमाला 1 कोटी 11 हजार 600 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. सदर उपक्रमामुळे या दिव्यांग लाभार्थींना रोजगार निर्मिती होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगार निर्मितीसह उत्पन्नात वाढ या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. किमान 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या लाभार्थींना यात प्राधान्य देण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा समन्वयक सुमेध तायडे यांनी प्रास्ताविकात दिली