मुंबई, दि. ०९ : ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले- शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात बैठक विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, खजिनदार ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, कार्याध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी), उपाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, उपाध्यक्ष ह.भ.प.बापू महाराज देहूकर, सहसचिव ह.भ.प.नरहरी बुवा चौधरी यांच्यासह पंढरपूर आणि आळंदीचे महाराज आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येणार
श्री.देशमुख म्हणाले की, आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृह आयोजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील वारकरी उपस्थित होते. आजच्या या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात ५ हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल.
आज या निमित्ताने वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
श्री. थोरात म्हणाले की, विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयेाजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील वेगवेगळ्या भागातून मोठा वारकरी संप्रदाय आज येथे उपस्थित झाला आणि या वारकरी संप्रदायाला भेटता आले याचा आनंद आहे. महाराष्ट्रात संतपीठ होण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे कारण या संतपीठाच्या माध्यमातून संतांनी दिलेली शिकवण, आचार विचार, आपली संस्कृती परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
माजी विधानसभा अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले म्हणाले की, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाने आपले विचार शेतकरी वर्गाला सांगितले होते आणि त्याचा फायदाही झाला होता. संतांची शिकवण, त्यांचे विचार हे समानता सांगणारे असून समाजासाठी दिशादर्शक आहेत. फक्त महाराष्ट्रात असलेली संत परंपरा जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
श्री.मोरे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी संप्रदायाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळातही नाती टिकविण्याचे काम वारकरी संप्राय करीत असून पंढरपूर येथे संत पीठ स्थापन होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केले. या बैठकी दरम्यान उपस्थित मान्यवरांचा समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.