पशुधनाच्या आरोग्यविषयक सुविधा तात्काळ मिळणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

नागपूर, दि. १२  : पशुवैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया  व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय कृषी  विकास योजनेंतर्गत ६  कोटी ९१  लाख रुपये निधी खर्चून पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रास्ते विकास  व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. केदार बोलत होते.

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजीत वंजारी, मापसूचे कुलगुरु डॉ. ए. एम. पातुरकर, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे, डॉ. संदीप इंगळे, डॉ. वैद्य, डॉ. दुधलकर यावेळी उपस्थित होते.

मध्य भारतात प्राण्यांच्या आरोग्यविषयक सुविधा व औषधोपचारासाठी हे एकमेव संकुल असल्याचे सांगताना श्री. केदार यांनी  शेळी व कुक्कुट पालनावर शासनाचा अधिक भर राहणार असून विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे निश्चितच चालना मिळणार आहे. शेळीचे दुध आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे ‘सानेन’या प्रजातीच्या शेळीचे पालन करुन दुग्ध उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषीसह पशुसंवर्धनावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाचे विस्तारीकरण करुन हे ज्ञान सामान्य नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागात शिबीर आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  विद्यापीठाने ग्रामीण भागात जनजागृती करुन ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.

सर्व सुविद्यायुक्त असे अत्याधुनिक पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुल नागपूर येथे झाले. त्यामुळे प्राण्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळून बाहेरुन उपचार करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर पशुपालकांना इथेच सर्व सुविधा मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी सांगितले.

विदर्भात ६  हजार ५००  हजार मामा तलाव आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल. आज संशोधन व तंत्रज्ञानाला महत्व प्राप्त झाले असल्याचे  त्यांनी सांगितले.

या चिकित्सालयामुळे पशुपालकांना निश्चितच फायदा मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयाने ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येईल, असे ए. एम. पातुरकर यांनी सांगितले.

प्रारंभी  शिलालेखाचे उद्घाटन करुन मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली. पशुपालकांसाठी ‘एम्स किसान पोर्टल’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक श्री. सोमकुवर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री. आखरे यांनी मानले. या कार्यक्रमास पशु व मत्स्य परिषदेचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *