सावली तालुक्यात विकासकामांची मालिका सुरू ठेवणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. १३ सप्टेंबर: विकासाच्या दृष्टीने सावली तालुक्यामध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावली तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त झाली असून विकास कामांची ही मालिका सावली येथे अशीच सुरू राहणार आहे. अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सावली तालुक्यातील खेडी या गावांमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी  पंचायत समिती सभापती विजय कोरेवार,सरपंच सचिन काटपल्लीवार, उपसरपंच मुक्ता गडतुलवार,पंचायत समिती सदस्य उर्मिला तरारे,राकेश गड्डमवार, दिनेश पाटील चिटनुरवार, राजू सिद्दम, तहसीलदार परीक्षित पाटील, तलाठी श्रीमती जाधव, उपविभागीय अभियंता चंद्रशेखर कटरे, शाखा अभियंता सुधीर राऊत आदी उपस्थित होते.

सावली तालुक्यामध्ये अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहे.असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, खेडी या गावामध्ये मुख्य रस्ता उखडलेला आहे, त्यामुळे या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 1 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. या रस्ते कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळतील असे ते म्हणाले.

त्यासोबतच गावातील सामान्य गरीब नागरिकांसाठी लग्न समारंभ, व इतर कार्यक्रमासाठी ५००  ते ७००  लोक बसू शकतील असे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त सभागृहाच्या बांधकामासाठी ३०  लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच खेडी या गावातील तलाठी कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे नवीन इमारतीची नितांत गरज होती. ही गरज लक्षात घेऊन २० .५९  लक्ष रुपये उपलब्ध करून देत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंचनाच्या सोयीमध्ये जिल्ह्यात सावली हा सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला तालुका आहे, तर  महाराष्ट्रात सर्वात अधिक सिंचन क्षेत्र असलेला तालुक्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्याची नोंद होते. आतापर्यंत ७४ ,४७०  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. तसेच पुढच्या एक वर्षात सर्व सिंचनाची कामे प्राधान्याने करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. सिंचनाच्या क्षेत्रात मोठे काम या दोन तालुक्यात झाले असून त्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. गोसेखुर्दमुळे तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करण्यात आले व येत आहे. तसेच पुढच्या वर्षापासून या परिसरामध्ये तेलंगाणासारखे धानाची तीन पिके घेतली गेल्यास येथील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल असेही ते म्हणाले.

मुल एमआयडीसीमध्ये इथेनॉलचा प्रकल्प सुरू करण्यात येत असून सावली तालुक्यातील व आसपासच्या किमान ५००  बेरोजगार तरुणांना मोठी रोजगाराची संधी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. सावली तालुक्यात पुढील आठवड्यात फिरते आरोग्य पथक वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असून या वाहनाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावागावात जाऊन  नागरिकांची आरोग्य तपासणी करतील व त्यांना योग्य वेळेत उपचार देण्यास मदत मिळेल. त्यासोबतच पुढील दोन वर्षानंतर या परिसरामध्ये साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न असून ते पूर्णत्वास नेण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. विकासामध्ये सावली तालुक्यातील खेडी या गावाला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवणार, खेडी हे गाव पंचक्रोशीत विकसित, आदर्श व व्यसनमुक्त गाव म्हणून पुढे नेणार, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

विविध विकास कामांमध्ये मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन,सामाजिक सभागृहाचे भुमीपुजन, तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण इत्यादी कामांचा समावेश आहे. यावेळी  खेडी गावातील सर्व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *