मुंबई, दि. १४ : तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांपैकी राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
श्री.टोपे यांनी चेन्नई येथे भेट देऊन तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशनच्या कामाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.दारेज अहमद, उपायुक्त डॉ.मनिष आदी उपस्थित होते.
श्री.टोपे यांनी भेटीत तमिळनाडू वैद्यकीय पुरवठा साखळीची माहिती घेतली. तमिळनाडू वैद्यकीय साहित्य, औषधे पुरवठा करण्याबाबत राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती घेतली. तमिळनाडू मेडिकल सप्लाय कार्पोरेशन राबवत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात फेरबदल करुन महाराष्ट्रात राबवण्यात येतील. जेणेकरुन राज्यातील वैद्यकीय साधनसामग्री आणि औषध पुरवठा अधिक जलद आणि सुसूत्र पद्धतीने होईल, असे श्री.टोपे यांनी सांगितले.
श्री.टोपे यांनी यावेळी तमिळनाडूत राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य व्यवस्थेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उत्तम उपाययोजनांचाही आढावा घेतला.