‘तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी’ विषयावर चर्चासत्र
Ø ३ तास उद्योग व्यापार क्षेत्रातील संघटनांशी चर्चा
Ø पोलीस, मनपा, जिल्हा क्षेत्रातील अडचणींचा आढावा
Ø पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
Ø १००% लसीकरण करणाऱ्या नगरसेवकाला दहा लाखाचा पुरस्कार
Ø प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्थेसह व्यापारी संघटनांकडून आयोजन
नागपूर दि. २१ : राज्य शासन असो वा जिल्हा प्रशासन सर्वोच्च प्राथमिकता सामान्य माणसाच्या जीवाची काळजी घेणे आहे. कोरोना काळात याच सूत्राने लॉकडाऊन व निर्बंधासंदर्भात निर्णय घेण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत सुरु राहील ही काळजी घेऊनच यापुढेही धोरणांची आखणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.
प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन या तीन संस्थांच्या पुढाकारात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राच्या आयोजनाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाइन सहभाग घेत शुभेच्छा दिल्या. नागपूरमध्ये हा एक उत्तम प्रयोग होत असून या विचारमंथनातून पुढे येणारे तथ्य राज्य शासनाला धोरण ठरवतानाही कामी येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या चर्चासत्राला विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशन, वेद, एमआयए, क्रेडाई, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, यासह व्यापार-उद्योग औद्योगिक वसाहती, बिल्डर असोसिएशन व वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग होता. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशासन निर्णय घेत असताना संघटनांच्या अडचणींना लक्षात घ्यावे, अशी मागणी या विविध संघटनांनी या चर्चासत्रात केली. चार टप्प्यात झालेल्या या चर्चासत्रामध्ये सुरुवातीला जिल्हाधिकारी विमला आर. यांच्यासोबत विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे श्रवण कुमार मालूयांनी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार यांच्यासोबत तेजिंदर सिंग रेणू यांनी तर नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अश्विन मेहाडिया यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सोबत व्यापार, उद्योग समूहातील विविध अडचणीबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चासत्राची मांडणी रामकिसन ओझा यांनी केली. या तीन सत्रातील चर्चेला एकत्रित उत्तर देताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्व घटकांना विश्वासात घेऊन स्थानिक स्तरावर देखील निर्णय घेतला जाईल, असे आश्वस्त केले.
स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित या चर्चासत्रात तीन तास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात विचारमंथन झाले. गेल्या दीड वर्षांमध्ये या साथ रोगामुळे व्यापार-उद्योग, निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहांवर आर्थिक संकट आले असून जिल्ह्यातील उद्योग अतिशय वाईट स्थितीतून जात असल्याचे विविध मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्पष्ट केले. यावर उत्तर देताना पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व परिस्थितीची जाणीव राज्य शासनाला आहे. जिल्हा प्रशासनालाही याची जाणीव आहे. त्यामुळेच यापूर्वी झालेले सर्व निर्णय विविध घटकांशी समन्वय साधून घेतले गेले आहे, राज्य शासन देखील या साथ रोगाशी लढतांना केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करते. त्यामुळे देशभर स्थिती अशीच आहे. तथापि, नागपूर तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही. औषधांचा तुटवडा भासणार नाही. तसेच रुग्णांचे वहन करताना अडचणी येणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विदर्भामध्ये ऊर्जा विभागामार्फत २०० ॲम्बुलन्सचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या पूरक व्यवस्थेसाठी ऊर्जा विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. ऑक्सिजन संदर्भात सर्वपक्षीय मदत झाली आहे. तिसऱ्या लाटेसाठी मेडिकल, मेयो, एम्स,येथे पीएससी प्लांट उभारणे अंतिम टप्प्यात आहे. पीएम केअर मधून मेडिकलमध्ये आणि कामठीमध्ये प्लांट उभारणे प्रगतीपथावर आहे. नागपूरने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक बेडची व्यवस्था केली आहे. सध्या 3 हजार 226 बेड उपलब्ध आहेत. कॉल सेंटर सुरू करण्यात आले. मनपा क्षेत्रात ५६ तर ग्रामीण भागात 116 अशा एकूण 172 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. डेडबॉडी व्यवस्थापन करण्यात आले आहे. शववाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्याने घेतलेल्या आघाडीबाबतही अवगत केले. नागपूर शहरात १९ सप्टेंबर पर्यंत १९ लक्ष ११ हजार लोकांचे लसीकरण झाले आहेत. तर नागपूर ग्रामीण भागात १४ लक्ष ४६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण हे मुख्य कवच असून व्यापारी उद्योजकांनी याबाबतीत ग्राहकांशी संवाद साधावा, कोविड प्रोटोकॉल पाडण्यासाठी आवाहन करावे, असे त्यांनी सांगितले. उद्या मंगळवारी जिल्ह्यामध्ये फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोविड तिसऱ्या लाटेच्या समर्थपणे सामना करण्यासाठी टीम वर्कची गरज आहे. उद्योग-व्यापार दुकाने सुरू राहावी. आपल्या जिल्ह्याची अर्थसत्ता अधिक मजबूत व्हावी. जिल्ह्याची प्रगती व्हावी. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा. आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहून कोविड नियंत्रणात राहावा. ही आमची इच्छा आहे. यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सर्व व्यापारी समुदाय यांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या निवेदनात केले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी प्रशासन पालकाच्या भूमिकेत असते. प्रशासनाची नजर पूर्ण वर्तुळाची असते. त्यामुळे व्यापार उद्योग समूहाने निश्चिंत असावे. प्रशासनाला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासनाने आखलेल्या आराखड्यानुसार अंमलबजावणी पोलीस प्रशासन करते. अगदी शेवटचा उपाय म्हणून सक्तीने कायदा वापरला जातो. आमचे देखील 24 जवान या लढ्यात शहीद झाले आहे. त्यामुळे हा विषय थेट जिवित्वासी जोडल्या गेल्यामुळे संवेदनशीलतेने समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एका बहुरूपी विषाणूशी हा लढा असून डेल्टा व्हेरीएंटच्या वर्तणापासून सामान्य नागरिकांच्या प्राथमिक गरजांना अडथळा निर्माण होणार नाही असा मोठा परिवेष प्रशासनाचा आहे. त्यामुळे कोरोना साथ रोगाची व्याप्ती लक्षात घेऊन व्यापारी समुदाय यांनी प्रशासनाला मदत करावी, महानगर वैद्यकीयदृष्ट्या तिसऱ्या लाटेला समर्थपणे सामना करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवकांना पुरस्कार
या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नितीन राऊत यांनी महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या वार्डात संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या नगरसेवकाला कार्यासाठी अतिरिक्त दहा लक्ष रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा यावेळी केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकिसन ओझा यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे प्रदीप खंडेलवाल,एमआयएचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन महाडिया, वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव,विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रावण कुमार मालू, तेजिंदर सिंग रेणू, विश्वजीत भगत, मनोहर बुद्धेश्वर, हरीश भोनेज, गिरीश गांधी, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते. रामावतार तोतला यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.