मुंबई, दि. २४ : “स्वातंत्र्यसेनानी आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या निधनानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, गोवामुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अतुलनीय साहस दाखवणारा महान क्रांतीवीर हरपला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचं क्षात्रतेज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा कौटुंबिक, वैचारिक, राष्ट्रभक्तीचा वारसा समर्थपणे पुढे नेतांना महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी, समतेच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शकाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही आधुनिक राष्ट्रनिर्मितीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांचं निधन हा महाराष्ट्राच्या कृतीशील वैचारिक चळवळीला मोठा धक्का आहे. आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.