नांदेड, दि. २४ : ज्येष्ठ काँग्रेस नेते व विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस विचारधारेसाठी समर्पित एक सच्चा सेनानी काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
श्री. अशोकरावजी चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि विधिमंडळात सहकारी म्हणून आम्ही एकत्र काम केले होते. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात त्यांची हातोटी होती. त्यांनी दीर्घ काळ काँग्रेस पक्ष व लोकांची सेवा केली. आ. रणपिसे यांच्या अकस्मात निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांना श्री.चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.