औरंगाबाद, दिनांक २७ : समाज मनाला एकत्र आणण्याचे काम हे वारकरी संप्रदायाच्या चळवळीतून झाले असून ही संत वाङ्मय परंपरा मराठवाड्याने जोपासली आहे. समाज मनाला कोणत्या प्रागतिक विचारांची गरज आहे हे साहित्यकांनी ओळखून वाचन संस्कृती जोपासण्यात साहित्यकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केले.मराठवाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, के.एस.अतकरे, साहित्यिक दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
आज व्हॉटसॲपच्या जमान्यात वाचन, लेखन संस्कृती ही हरवत चालली आहे. मराठवाड्याला बंडखोर साहित्य, विद्रोही साहित्य, दलित साहित्य आदी साहित्याच्या माध्यमातून गंगाधर पानतावणे, नामदेव ढसाळ, यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकांची परंपरा मराठवाड्याला लाभली असून या परंपरेला जोपासण्याची जबाबदारी ही साहित्यिकांवरच असल्याचे सांगून श्री.आव्हाड म्हणाले की, उर्दु साहित्यावर देखील विपुल लेखन मराठवाड्यात झाले आहे त्यात बशर नवाज यांना विसरुन चालणार नाही. सर्व समुदायाच्या भाषेचे मिश्रण हे उर्दुत पहावयास मिळते आणि त्यामुळेच मराठवाड्याला विशेष महत्त्व आहे. प्रागतिक विचार म्हणजे विचाराची देवाण-घेवाण म्हणजे लोकशाहीचा सन्मान होय आणि म्हणूनच समाज प्रबोधनाकरीता सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता साहित्य संमेलन होणे गरजेचे असून लोकवर्गणीतून मराठवाडा साहित्य संमेलन झाले याचे विशेष कौतुक आहे. ज्यापद्धतीने गेले दोन दिवस येथे दर्जेदार कार्यक्रम झाले. त्यात आजची उपस्थितांची संख्या ही या संमेलानाचे यशस्वीता दर्शवते, असे गौरवोद्गार श्री.आव्हाड यांनी संमेलानाच्या समारोप प्रसंगी काढले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की अतिशय बिकट परिस्थितीत मराठवाड्याने निजामराजवटीमध्ये मराठी भाषा जपली आणि यांची जाणिव तत्कालीन मुख्यमंत्री यशतंराव चव्हाण यांना होती आणि म्हणूनच त्यांनी मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे स्थापनेकरिता १९६० मध्ये शासनाच्या वतीने १० हजार रु. इतके अनुदान सर्व साहित्य मंडळाकरिता चालु केले त्याचबरोबरच मराठवाडा विद्यापीठाची स्थापना देखील केली मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून गेल्या काही वर्षात थांबलेला निधी मिळावा अशी माफक अपेक्षा श्री.ठाले यांनी समारोपीय भाषणात केली.
संमेलन अध्यक्ष श्री.बिरादार आपल्या समारोपीय भाषणात म्हणाले की, निसर्ग नियमानुसार चांगल्या किंवा वाईट गोष्टींना हा शेवट असतोच त्याच नियमाने आज समारोपीय भाषण होत आहे. मराठवाड्याने सांस्कृतिक ब्रीदचा वसा या संमेलनाच्या निमित्ताने समर्थपणे पेलला आहे. आज जगभरातील घटनापासून समाजमन अस्वस्थ आहे. दुभंगलेल्या समाजमनाला एकत्र आणण्याचे काम साहित्य करत असते म्हणून साहित्याला जगात दुसरा पर्याय नाही.
आजच्या या यशस्वी संमेलनात सृजनमनाचे धुमारे फुटले असल्याचे सांगून श्री.बिरादर यांनी
कोण होते बापा
गेले देशोदेशी सांगावया
वाऱ्या हाती दिला माप
समर्थ होऊ माझा बाप
या संत तुकाराम महाराजाच्या अभंगानी समारोपीय भाषणाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यक रा.र.बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कांदबरीला ५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. किरण सगर, राजेश करपे, दादा गोरे यांची देखील यावेळी समायोचित भाषणे झाली.कार्यक्रामाचे प्रस्ताविक राम चव्हाण यांनी केले. कार्यक्रमांची सांगता बाळासाहेब शेंदुरकर, श्रावण क्षिरसागर, माधवी देवळांनकर, कांचन चव्हाण यांच्या पुस्तक प्रकाशनाने झाली तर आभार कुंडलिक अतकरे यांनी मानले.