मुंबई, दि. २९ : नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०९ मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे वर्ष २०२१-२२ मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०९ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.