अमरावती, दि. ०२ : भातकुली येथे एका घरावर वीज कोसळण्याची घटना घडल्याची माहिती मिळताच पालकमंत्रीॲड. यशोमती ठाकूर यांनी त्या घराला भेट देत झालेल्या घटनेची चौकशी केली तसेच घरातील कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
अमरावतीतील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत असताना पालकमंत्रीॲड. यशोमती ठाकूर या भातकुली गावात पोहोचल्या होत्या. यादरम्यान गावात गवई कुटुंबाच्या घरावर वीज कोसळण्याच्या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री तातडीने त्या घराकडे धावल्या. घरातील कुटुंबीयांची आणि मुलाबाळांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. घराच्या मागील बाजूस असलेल्या छोट्या खोलीवर वीज कोसळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र वीज कोसळल्याने घरातील काही वस्तूंचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत संबंधितांना पंचनामा करण्याची सूचना देत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी श्रीमती मंदाताई गवई यांना धीर दिला. शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.