डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल.

बारामती दि.०३ :- डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बारामती तालुक्यात डिजिटल स्वाक्षरित ७/१२ वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसिलदार विजय पाटील उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरित ७/१२ वाटपाचा कार्यक्रमास सुरुवात होत आहे. हा एक चांगला उपक्रम असून त्यामुळे कामात अचुकता आणि गतिमानता येईल. सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागणार नाही.  त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत होईल. महसूल विभागाच्या कामात पारर्दशकता येईल.

महसूल विभागाने ५० वर्षानंतर ७/१२ उपलब्ध करून देण्याचा पद्धतीत बदल केले आहेत.  महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे.  राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी हा डिजिटल ७/१२ चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याबरोबरच शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना नियंत्रणासाठी मास्कचा वापर आवशयक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, कोरोना बाधीतांची संख्या वाढणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. नवरात्रमध्ये सर्व धार्मिक ठिकाणे खुली केली जाणार असताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.  कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यावी.  बारामतीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे पेशंट वाढत असल्याने आरोग्य विभागाने त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील दहा खातेदारांना मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले. तसेच दोन लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेतून २० हजार रुपयांचे धनादेशचे वाटप करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी प्रस्ताविकात नव्या उपक्रमाची माहिती दिली. बारामती तालुक्यात खातेदार संख्या १ लाख ४२ हजार ३०६ व एकूण सातबारा संख्या ८२ हजार ७२१ आहे. डिजिटल ७/१२ वाटपाची मोहिम आजपासून ९ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपकार्यकारी अभियंता राहूल पवार,   उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, निवासी नायब तहसिलदार विलास कारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *