प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती देऊन सिंचनाची कामे वेळेत पूर्ण करा.

नाशिक दि. ०३ : जिल्ह्यात सुरू असणाऱ्या प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती देऊन सिंचनाची सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कामांचे नियोजन करताना तेथील भूमिपुत्रांचा विचार करून त्यांना पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक कि.भा. कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रमोद मांदाडे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक आर. आर. शहा, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, अरूण नाईक, महेंद्र आमले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, नांदुर मधमेश्वर प्रकल्पात असणाऱ्या पक्षी अभयारण्याच्या अनुषंगाने बीओटी (बांधा, वापरा व हस्तांरीत करा) या तत्वावर तसेच पर्यटन विभागाच्या सहाय्याने पर्यटन केंद्र विकसित करण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतीसाठी धरणातील गाळ अत्यंत पोषक असल्याने प्रकल्पांमधील गाळ काढण्याची प्रक्रीया राबविण्यात यावी. तसेच सिंचनाच्या प्रभावी उपाययोजनेसाठी पालखेड कालवा नुतनीकरणाच्या कामाकरीता ३८ कोटी तसेच गोदावरी उजवा व डावा कालव्यांच्या बांधकामाला १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यासाठी ८४ कोटी तर मालेगाव बोरी अंबेदरी, दहीकुटे या लघुपाटबंधारे अंतर्गत बंद पाईपमध्ये रुपांतराच्या कामाला २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील देवसाने मांजरपाडा प्रवाही वळण योजनेची घळभरणी पूर्ण करुन ६०६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची क्षमता चालू हंगामामध्ये निर्माण करण्यात आली आहे. यातूनच आजपर्यंत साधारण ५०० दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे. तसेच उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतील दरसवाडी पुर चारीच्या वरील रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रलंबित असलेले काम जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी कौशल्यरित्या करून दरसवाडी कालवा पुर्ण करण्यात आला आहे. या कामाचे कौतुकही जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

नार-पार महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा : पालकमंत्री छगन भुजबळ

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी आपल्या राज्यात वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची तहान भागून मराठवाड्याला देखील पाणी वळविणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदीजोड प्रकल्पांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात यावा. जेणेकरून हे प्रकल्पांचे काम सुरू करणे शक्य होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

बैठकी दरम्यान उपस्थित आमदार यांनी आपल्या मतदार संघातील विविध योजना व प्रकल्पांच्या बाबत येणाऱ्या अडचणी दूर करून सुरू असलेले संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबैठकीत जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या सिंचननामा यापुस्तिकेचे प्रकाशन जलसंपदा मंत्री श्री. पाटील व पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ती जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *