अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.आघाव ‘आयडिया-थॉन’ मध्ये देशस्तरावर द्वितीय

मुंबई, दि. 6 : अन्न व औषध प्रशासनाच्या बृहन्मुंबई विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.धनंजय विक्रम आघाव यांनी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याद्वारे आयोजित आयडिया-थॉन या स्पर्धेत अन्न व्यावसायिकांसाठी “व्यवसायातील सुलभता” या संकल्पनेअंतर्गत अखिल भारतीय स्तरावर “अन्न व्यावसायिकांसाठी जागेवर अन्न नोंदणी प्रमाणपत्र” च्या संकल्पनेसाठी द्वितीय क्रमांक मिळवला.

रु. 12 लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या छोट्या अन्न व्यवसायांना अन्न व औषध प्रशासनाद्वारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जातात. यात मुख्यतः स्ट्रीट फूड विक्रेते, किरकोळ विक्रेता इत्यादींचा समावेश आहे. नोंदणीसाठी अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे केला जातो ज्यासाठी लहान अन्न व्यवसाय चालकांना नोंदणीच्या आवश्यकतेबद्दल माहिती नसते. बहुतेक वेळा त्यांना ऑनलाइन प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे स्थानिक एजंट किंवा सायबर कॅफेमधील व्यक्तीकडून अन्न  व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व्यावसायिकांच्या सोयीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी, डॉ. आघाव यांनी “किरकोळ अन्न व्यवसायांना जागेवर नोंदणी आणि किरकोळ अन्न व्यवसायिकांना जागेवर तडजोड” ही संकल्पना अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याद्वारे आयोजित आयडिया-थॉन या स्पर्धेत सादर केली.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्लीच्या पॅनेल सदस्यांनी संकल्पनेची प्रशंसा करून या संकल्पनेस देशस्तरावर द्वितीय क्रमांक जाहीर केला आहे ज्यामध्ये  प्रशस्तीपत्र व रोख रु.७००० चा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र चे आयुक्त श्री. परिमल सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी देखील डॉ. आघाव यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *