उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्या .

वर्धा, दि: १२ :  शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तातडीने कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे  निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.

कृषि कर्जमाफी योजनेसह पांदन रस्ते, क्रीडा संकुलावर सोलर पॅनल लावणे तसेच बंधा-यांची दुरुस्ती, म्हाडा वसाहतीची दुरुस्ती आदी बाबींचा पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकित आढावा घेतला. यावेळी आमदार रणजित कांबळे, माजी आमदार अमर काळे,  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी योजनेचे ५९ हजार इतके पात्र शेतकरी असून ५२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित ४ हजार ६०० शेतकऱ्यांना तातडीने योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना लेखी कळवून त्यांचे प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. आतापर्यंत ४६० कोटी रुपये या योजने अंतर्गत वितरीत करण्यात आले आहे.

पांदण रस्त्यांच्या कामासाठी सीएसआरमधून विविध कंपन्यांकडून मशीन व साहित्य आदी मदत घेऊन कामे पूर्ण करण्यात यावीत. क्रीडा संकुलांचा विजेवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुलांवर सोलर पॅनल बसविण्यात यावेत. वर्धा शहरातील म्हाडाच्या बहुमजली वसाहती जिर्ण अवस्थेत आहेत. या निवासी गाळ्यांचे दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

यावेळी हिंगणघाट तालुक्यातील सावंगी हेटी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, वाठोळा येथील राज्य महामार्ग सिमारेषेत गेलेल्या जमीनीतील शिल्लक राहिलेल्या भूखंडाचे संबंधितांना वाटप तसेच आष्टी तालुक्यातील वन विभागाच्या मंजूरीमुळे रखडलेल्या वडाळा ते येनाळा या रस्त्याच्या कामांचा आढावाही यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *