शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन भेटण्यासाठी विशेष मोहीम सुरु

नाशिकदि१२ : नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर येथील वीर माता यांना जमीन मंजुरीचा आदेश सुपूर्त करताना शहीद जवानास योग्यरीत्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या जमीन मंजूर आदेश प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार राजेंद्र नजन, स्वीय सहायक संतोष तांदळे, दिनेश वाघ, आदित्य परदेशी, वीरमाता किसनाबाई बोडके, वीरपिता श्रीकृष्ण बोडके, प्रीती बोडके, सुरेश कातकाडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, देशाच्या सीमेवर कार्यरत असताना देशासाठी बलिदान केलेल्यांप्रती शासनाची भूमिका अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यातील आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काम सुरु असून त्यासाठी विशेष मोहीम आपण हाती घेतली आहे. २४ सप्टेंबर २००२ मध्ये जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद श्रीकांत श्रीकृष्ण बोडके यांना वीरगती प्राप्त झाली होती. आज त्यांना जमीन मंजूर आदेश सुपूर्द करताना जवानास योग्यरीत्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान आहे.

वीरमाता किसनाबाई बोडके यांनी, शहीद झालेल्या माझ्या मुलाची नेहमीच आठवण येत असते. मुलाने जिवंतपणी आई वडिलांसाठी काही करणे हा तर नियमच आहे; मात्र माझा श्रीकांत स्वतः देशासाठी शहीद होऊन आमच्यासाठी एवढ करून ठेवलंय याचा अभिमान वाटतो. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *