पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना.

मोथा-बासलापूर वनातील तलावाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन.

अमरावती, दि. १७ : चांदूर रेल्वे तालुक्यातील मोथा-बासलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.
वन विभागातर्फे बासलापूरच्या जंगलात निर्माण करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, तत्कालीन सहायक वन संरक्षक अशोक कविटकर, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मोथा बासलापूरच्या हिरव्यागार जंगलात या सुंदर तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. जलपूजनानंतर पालकमंत्री व इतर सर्व मान्यवरांनी तळ्यापासून काही अंतरावर वनविभागाने उभारलेल्या मनोऱ्यावर जाऊन वनाचे व परिसराचे अवलोकन केले व विविध बाबींची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली.
या तलावामुळे जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय होऊन त्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबेल. वनानजिकच्या शेती क्षेत्रातही भूजलपातळी सुधारण्यास या तलावामुळे मदत होणार आहे. वनाचे पर्यावरण सुधारण्याबरोबरच पर्यटकांसाठी हे स्थळ महत्वाचा आकर्षणबिंदू ठरेल. जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
तलावाच्या भिंतीची लांबी ३२० मीटर आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून त्याची खोली २० फूट आहे. सुमारे ८ कोटी लीटर पाणीसाठा येथे झाला  आहे. वनतलावासाठी जिल्हा नियोजनातून १८ लक्ष रुपये निधी देण्यात आला. तलावाचे अंदाजपत्रक व तलाव बांधकाम श्री. कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाळ आशिष कोकाटे, वनरक्षक संतोष आखरे, वनसेवक अजय चौधरी यांनी केले आहे. वनतलावासाठी योगदान देणाऱ्या या सर्वांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *