स्वातंत्र्य संग्रामात पालघर जिल्ह्याचे योगदान

भारताचा स्वातंत्र्य लढा ज्याला म्हणता येईल तो १९४७ साली संपला. संपला म्हणजे तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यालाही आता ७५ वर्षे झाली आहेत. भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. त्याला आता ७५ वर्षे होत आहेत. संपूर्ण देशात हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. याचा अर्थ असा होतो की, आज हयात असलेल्या सर्वात कनिष्ठ स्वातंत्र्य सैनिकाचे वय ९५ ते १०० वर्षे असले पाहिजे. सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः भारताला स्वातंत्र्य मिळाले.  स्वातंत्र्य लढ्यानंतर झालेल्या १९६० सालच्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनाही आपल्या देशात स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्यात आला आहे.

ब्रिटिश सरकारला दहशत बसविणाऱ्या क्रांतिकारक पंथाच्या पारंब्या कोकणातही पोहचल्या होत्या.  कोकणात सत्याग्रहाचा वणवा पेटला होता.  पुर्वीच्या काळी ठाणे जिल्हयात असलेला सध्याचा पालघर जिल्हा देखील या वणव्याने होरपळला होता. पालघर जिल्हयात सावंत मास्तर , सखाराम भी.पाटील, छोटालाल श्राफ, बाबासाहेब दांडेकर, धर्माजी तांडेल, बाबुराव जानू, र.कृ.परुळेकर, भोगीलाल शहा, हरी दा.राऊत, र.ल.शिंदे, रंगनाथ वरदे, मुकुंद संखे, भुवनेश किर्तने, सौ.रमा दांडेकर, सो.मंजूळा पागधरे, मारुती मेहेर, तात्या सामंत, डॉ.ए.आर.पाटील हे स्वातंत्र सैनिक झाले. १९४२ च्या आंदोलनात पालघर जिल्हयातील सामान्य जनतेने अभूतपूर्व उठाव केला होता. माहिम पालघर भागात १९१६ च्या आसपास राजकीय हालचालींना प्रत्यक्षात आरंभ झाला. मार्च १९१८ च्या प्रथमार्धात लोकमान्य टिळकांनी  ठाणे जिल्हयाचा दौरा केला. त्याच दरम्यान त्यांनी पालघरला सभा आयोजित केली. १९०४ पासून शिक्षणानिमित्त पुण्यात असलेले बाबासाहेब दांडेकर यांच्या घरासमोरील भव्य मंडपात ही सभा आयोजित केली.  लोकमान्य टिळकांसारख्या एका महान राष्ट्रीय नेत्याचा प्रथमच पदस्पर्श या भूमिला होणार असल्याने सभेला वसई, वाडा, जव्हार,डहाणू या भागातून खूप मोठा श्रोतृवर्ग  उपस्थित होता. टिळकांनी आपल्या भाषणात स्वराज्य का हवे, हे ओजस्वीवाणीत सांगितले. आणि “होमरुल” लिगची माहिती दिली. पालघरच्या परिसरात राष्ट्रीय चळवळीचा भक्कम पायाच लोकमान्य टिळकांच्या हस्ते घातला गेला. होमरुल कार्यालयास पालघर तालुक्याने त्या काळात रुपये ३ हजार ६०० चा निधी दिला. १९२८ साली सरदार पटेल यांना पालघर येथे आमंत्रित केले. बार्डोलीचे विजयी सरदार म्हणून गणेश गं. दांडेकर यांच्या पटांगणात ८-१० हजार श्रोत्यांसमोर रात्रीच्या वेळी त्यांचे स्फूर्तिदायक भाषण झाले. गांधीजींचे विचार आणि लढण्याची पध्दत त्यांनी लोकांना समजावून सांगितली. त्यामुळे गांधीजींच्या नव्या सत्याग्रह पध्दतीने सामर्थ्य येथील जनतेच्या मनावर बिंबले. पालघर तालुक्यात गांधी युगाचा आरंभ सरदारांच्या हस्ते झाला.

काँग्रेस कार्यकारणीने तयार केलेल्या “चलेजाव” ठरावाला या आधिवेशनात लाखो लोकांच्या मुखाने प्रचंड गर्जना करून संमती देण्यात आली. स्वदेशाच्या मुक्ततेच्या  या लढयासाठी “करेंगे या मरेंगे” या निर्धाराने आपली शक्ती सर्वस्व पणाला लावणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. आपण आजपासून स्वतंत्र भारताचे एक नागरिक आहोत या भावनेने प्रत्येकाने प्राण झोकून काम करावे, रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील. अशा प्रकारच्या स्फूर्तीदायक वचनांनी ओतप्रोत भाषणे ऐकून सर्वांची अंतकरणे भारावून गेली. येथूनच एका अभूतपूर्व क्रांतियुध्दाचे रणशिंग फुंकले गेले.

“चले जाव” अधिवेशानंतर दुसऱ्या दिवसापासून मुंबईत १४ ऑगस्ट १९४२ रोजी लोक आंदोलनाला सुरुवात झाली. पाठोपाठ वसई, पालघर, बोर्डी, डहाणू या मुंबई लगतच्या भागातही लोकांची प्रक्षुब्ध निदर्शने सुरु झाली. त्यानुसार पालघर तालुक्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. निघालेल्या मोर्चावर पोलीसांनी अमानुष लाठी हल्ला-गोळीबार केला. या गोळीबारात गोविंद गणेश ठाकूर, नांदगांव, वय-१७, काशिनाथ हरी पागधरे, सातपाटी वय-२६ ते २७, रामप्रसाद भिमाशंकर तिवारी, पालघर वय-१७, रामचंद्र माधव चुरी, मुरबे वय-२४ ते २६, सुकूर गोविंद मोरे, शिरगांव वय-२२ ते २३, हे पाच स्वतंत्र सेवक हुतात्मे झाले. २२ जण कमी अधिक जखमी झाले. त्याच दिवशी चिंचणी येथेही क्रुरपणे गोळीबार झाला.

त्यात दोन स्वतंत्र सेवक हुतात्मे झाले. पश्चिम किनारपट्टीवर मोठया प्रमाणात निदर्शने झाली. ती सरकारने निर्दयीपणे चिरडून टाकण्यास सुरुवात केली. निशस्त्र व अहिंसक जमावावर बेछुट लाठया-बंदुका चालविण्यात आल्याने भिषण रक्तपात झाला. त्यामुळे काही दिवस दहशतीचे वातावरण निर्माण होऊन पालघरमधील जनतेचे मनोधैर्य खालावले.

पालघरचा गोळीबारात सातपाटीचे काशिनाथ पागधरे, नांदगांवचे गोविंद ठाकूर यांची समोरून क्रुरहत्या केल्याचे लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे या दोन्ही गावातील जनतेत विशेषत: तरुण कार्यकर्त्यांच्या मनात या घटनेचा सुड घेण्याची भावना निर्माण झाली. या मंडळींनी प्रथम स्फोटके वापरून पालघर ते बोईसर दरम्यानचा रेल्वे मार्ग उद्ववस्त करण्याचा कट रचला होता. यातील अनेक कार्यकर्ते नवशिके असल्याने तसेच स्फोटके हाताळण्याचा अनुभव नसल्याने स्फोटके न वापरता फक्त हत्यारांनी रेल्वे मार्ग उखडून गाडया पाडण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार २६ ऑक्टोंबर १९४२ रोजी मुंबईकडून येणाऱ्या पालघर ते बोईसर दरम्यानच्या रेल्वेमार्गाचा  ३० ते ३५ फुटांचा तुकडा काढून पुलाखाली टाकण्यात आला. गाडी नेहमीच्या वेगाने धडपडत आली. वाफेचे इंजिन पुलावरून जातांना घसरले. घसरलेले इंजिन खाली न कोसळता पुलावरून पलिकडे जाऊन पुन्हा रुळावर चढले. इंजिनच्या मागे लागलेले २५-३० डबे खाली कोसळले. पण त्यात कोणताही स्फोट झाला नाही. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे सर्वांनी रोजचा दिनक्रम सुरु केला. या घटनेचा घरच्या मंडळींनाही पत्ता लागू दिला नाही. ही घटना म्हणजे भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक तेजस्वी साहसी कथा म्हणून ओळखली जाते.

१४ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या गोळीबारातील पाच हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीने पालघरमधील लोकांची मने एकत्र बांधली गेली. या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करण्यास दि.१४ ऑगस्ट १९४४ पासून प्रारंभ झाला. प्रत्यक्षात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५० साली गोळीबार चौकात “हुतात्मा स्तंभ” उभा करण्यात आला. या स्तंभाला पाच दिवे लावून १४ ऑगस्ट १९४२ च्या गोळीबारातील पाच हुतात्म्यांची स्मृती चिरस्थायी करण्यात आली आहे. स्तंभावरील शिळेवर या हुतात्म्यांची नांवे नोंदविली आहेत. हाच गोळीबार चौक तेव्हापासून “हुतात्मा चौक” किंवा “पाचबत्ती” या नावाने ओळखला जाऊ लागला. पालघरमध्ये १४ ऑगस्ट हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव होत असतांना हे स्मरण नव्या पिढीला निश्चितच उपयुक्त ठरेल!

संदर्भ- स्वातंत्र्य आंदोलनात पालघर तालुका.

प्रविण डोंगरदिवे

माहिती सहाय्यक

विभागीय माहिती कार्यालय

कोकण विभाग, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *