जांभा बु.च्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा.

अकोला,दि.२४ मुर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पात येणारे जांभा बु.  या गावाच्या पुनर्वसनासाठी १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जांभा बु. येथे दिले.

पालकमंत्र्यांनी आज मौजे जांभा बु. पुनर्वसित (काटेपूर्णा बॅरेज) या गावाला भेट  देऊन पाहणी केली व येथील पुनर्वसन कामाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित आढावा बैठक व सभेस गावच्या सरपंच अरुणा इंगळे,  माजी आमदार तुकाराम बिडकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार,  कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुळ प्रकल्प आराखड्यानुसार गावातील ६१ कुटुंबांचे पुनर्वसन सुरु आहे. तथापि, गावाला वेढा घालून वाहणारी नदी ही पावसाळ्यात पुरामुळे पाणी वाढते व गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक दिवस गावा बाहेर जाता येत नाही शिवाय गावातील शेती व अन्य व्यवहारांवरही परिणाम होतो. परिणामी गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना ते म्हणाले की,  या गावातील भौगोलिक रचनेनुसार गावाचे पुनर्वसन करण्याबाबत पुन्हा सर्वेक्षण करावे. हे गाव १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवावा,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी  यावेळी दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *