नांदेड प्रतिनिधी ०१ :- ९०-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी आज एकूण ४१२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत विविध निकषांच्या कसोटीवर ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. मतदारसंघातील मतदारांनीही लोकशाही व्यवस्थेला अपेक्षित असलेली प्रगल्भ वर्तवणूक दाखवून दिवसभरात मतदानाची ६३.९५ एवढी टक्केवारी साध्य करून दाखविली. मतदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांचे आभार मानले.
देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी एकूण पुरुष मतदार १ लाख ५४ हजार ९२ तर एकूण स्त्री मतदार १ लाख ४४ हजार २५६ एवढे आहेत. इतर मतदार 5 असे धरुन ही एकूण मतदारांची संख्या २ लाख ९८ हजार ३५३ एवढी आहे. यापैकी आज झालेल्या मतदानात १ लाख ९० हजार ८०० एवढ्या एकूण मतदारांनी आपला मतदानाचा हक्क व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यात पुरुष १ लाख ७६८ मतदार तर स्त्री ९०हजार ३१ मतदार तर इतर १ मतदार असा समावेश आहे. मतदानाची एकूण टक्केवारी ही ६३.९५ टक्के एवढी आहे.
ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने १ हजार ६४८ कर्मचारी आणि २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. या निवडणूकीत ४१२ मतदान केंद्रावर मतदान झाले आहे.