बुलडाणा,दि. ८: मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र आता कोरोना कमी होत आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्राची नेत्रदीपक प्रगती आहे. या जिल्ह्यात क्रिडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक क्रिडा सुविधा, आधुनिक साहित्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून देणार. त्यामुळे जिल्ह्याचा क्रिडा क्षेत्राचा निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज व्यक्त केला.
बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन आज ७ नोव्हेंबर रोजी देऊळघाट रस्त्यावरील जागेवर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जि. प अध्यक्ष मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, भारतीय तिरंदाजी संघाचे सचिव प्रमोद चांदूरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड विजय सावळे, क्रिडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, भाऊसाहेब जाधव, कुणाल गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे देशातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य असल्याचे सांगत क्रिडा मंत्री श्री. केदार म्हणाले, क्रिडा विद्यापीठाचे अभ्यासक्रमही अंतिम होत आहेत. त्यासाठी क्रिडा कौन्सिल स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठ पुणे येथे बालवाडीत सुरू झाले आहे. याबाबतचा कायदाही बनविण्यात आला. यापूर्वी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहायचे, शासनाने यामध्ये बदल करीत पालकमंत्री यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे देखील क्रिडा क्षेत्रातील प्रश्न समितीच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. येथील क्रिडा संकुल निर्मितीसाठी संपूर्ण निधी मार्च पर्यंत देण्यात येईल. निधी अभावी काम थांबणार नाही. धनुर्विद्या खेळाला प्रशिक्षक देण्याचा प्रश्नही लवकरच सोडविण्यात येईल.
यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात वेगवेगळ्या स्तरावर पदके मिळविली आहे. जिल्ह्याचा क्रिडा क्षेत्राची भरारी निश्चितच स्पृहणीय आहे. क्रिडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्याकरिता क्रिडा धोरणाप्रमाणे युवक कल्याण धोरण आणावे. गावागावात व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचा निश्चितच तरुणांना लाभ होणार आहे.
ते पुढे म्हणाले, दुधातील भेसळ थांबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त पथक निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे भेसळ रहित दूध मिळत आहे. क्रिडा क्षेत्रातील सुविधांमुळे जिल्ह्यात प्रतिभावान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच निर्माण होतील.
याप्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, क्रिडा संकुल तीन एकरात निर्माण होणार आहे. याठिकाणी सुसज्ज इमारत उभी राहणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकणारे खेळाडू निश्चितच निर्माण होणार आहेत. दरम्यान, क्रिडा संकुलातील सुविधा, माहिती यांचा समावेश असणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले. सुरुवातीला बुलडाणा तालुका क्रीडा संकुलाचे कुदळ मारून भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचलन क्रिडा अधिकारी श्री. धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन अनिल इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.