नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता

नागपूर, दि. १८ :  नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. डीजीसीएची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली येथील नागरी  विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.  नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती.

नागपूर फ्लाइंग क्लब येथे २०१७ पासून वैमानिक प्रशिक्षण बंद होते. वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ तसेच क्लबकडे असलेले सेसना ही चारही विमाने सज्ज करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले होते. तसेच उप मुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली होती त्यानुसार आवश्यक असलेली सर्व पदांची भरती करण्यात येवून विमानांची फिटनेस व मेन्टनन्स (एफटीओ) लायसन्स प्राप्त झाल्यानंतर नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणासाठी तसेच  फ्लाइंग क्लब  नव्याने सुरु करण्यासाठी डीजीसीएचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातर्फे मिळालेल्या सहकार्याबद्दल विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी  आभार व्यक्त केले आहे.

महाज्योती संस्थेसोबत सामंजस्य करार

नागपूर फ्लाइंग क्लब व महाज्योतीसोबत विद्यार्थ्यांना कमर्सियल पायलट(CPE) विमान चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत दरवर्षी २० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नागपूरसह मध्य भारतातील कमर्सियल पायलटसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आह नागपूर फ्लाइंग क्लबमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात आता संधी उपलब्ध होणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *