अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी अभियान

पुणे जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या बालमृत्यूपेक्षा कमी आहे. बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक बालकाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार मिळवून देणे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करीत लिंग गुणोत्तर वाढीस हातभार लावणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ४ हजार ६२३ अंगणवाड्या आहेत. ग्रामीण क्षेत्रातील बालमृत्यूच्या प्रमाणावर  नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांनी यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. या प्रयत्नांना अभियानाच्या माध्यमातून चालना देण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून ते २४ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येईल.

देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बालविकासाचे प्रयत्न अशा दोन्ही बाबींची सांगड या अभियानात घालण्यात येणार असल्याने बालकांच्या वेशभूषेद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती देण्यासारख्या उपक्रमांचाही यात समावेश आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यासोबच महिलांची रक्त तपासणी करण्यात येईल.

अतितीव्र (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका बालमृत्यू झालेल्या घरी भेटी देऊन कारणे जाणून घेतील. त्यांच्या अहवालानुसार पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. कुपोषणामुळे दुर्धर आजारी बालकांना विशेष शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील बालोपचार केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी बालमृत्यू कमी करण्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

गर्भवती मातेस १ हजार दिवस बालकांचे उपक्रमाबाबत माहिती देणे, गर्भवती मातेस पौष्टीक आहाराविषयी मार्गदर्शन करणे, स्तनदा मातांना बाळासाठी मातेच्या दुधाचे महत्व समजावून सांगणे, माहेरवाशीण गरोदार मातांना व्हीडीओ कॉलद्वारे मार्गदर्शन, ० ते ६ वयोगटातील बालकांची १०० टक्के तपासणी, तपासणी दरम्यान वजनवाढीची औषधे आणि जंतनाशक औषधे देणे, विशेष शिबिरांचे आयोजन असे विविध उपक्रम या दरम्यान राबविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागातर्फे हे अभियान राबवण्यिात येणार आहे. बालकांना वेळीच पूरक आहार आणि योग्य उपचार मिळाल्यास, त्याचप्रमाणे वेळीच संदर्भ सेवा मिळाल्यास बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी अशा सर्वांच्या प्रयत्नांतून बालकांना मिळणारी ‘बालसंजीवनी’ सुदृढ पिढी घडविण्यासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *