लेण्याद्री देवस्थान विकासाची कामे गतीने पूर्ण करा

पुणे दि. १४:  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेतले. दर्शनमार्गावरील प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, मंदिरातील प्रकाशव्यवस्था आदी विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, तहसीलदार रविंद्र सबनीस, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गोकुळ दाभाडे आदी उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सचिव जितेंद्र बिडवई यांनी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार केला.

याप्रसंगी श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानच्या विकास कामांसंदर्भात तसेच येणाऱ्या भाविकांना द्यावयाच्या  सोयीसुविधाबाबत चर्चा करण्यात आली. दर्शन मार्गावरील वीज व्यवस्था, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे तसेच मंदिरातील प्रकाश व्यवस्था करणे आदी कामे गतीने पूर्ण करावीत अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रशासनाने देवस्थानच्या विकासकामांसंदर्भात पुरातत्व विभाग व देवस्थान ट्रस्ट यांची वेळोवेळी बैठक घेऊन कामे मार्गी लावावीत. देवस्थानने शासनास कोविड सेंटरकरिता दिलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

देवस्थानकडून करण्यात येत असलेल्या विविध सामाजिक व धार्मिक कामांची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी श्री लेण्याद्री गणपती देवस्थानास सामाजिक कामाकरिता देणगी दिली. यावेळी गोळेगाव ग्रामपंचायत सरपंच  सुनीताताई मोधे, देवस्थानचे विश्वस्त शंकर ताम्हाणे, जयवंत डोके तसेच गोळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *