स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व’ : डॉ. दिलीप पांढरपट्टे

जळगाव दि १५ (जिमाका वृत्तसेवा): ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती राहिले’ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय भवरलाल जैन. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता अशा व्यक्तिमत्वाला मनापासून भावांजली वाहतो असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ‘भाऊंना भावांजली’ या कार्यक्रमात काढले.

बहिणाबाईंच्या कवितेने व गीतांनी परिवर्तनच्या “अरे संसार संसार” कार्यक्रमाने भावांजली महोत्सवाला सुरवात झाली. संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनतर्फे पद्मश्री भवरलाल जैन यांना आदरांजली देणारा आठ दिवसीय ‘भावांजली महोत्सवा’चे उद्घाटन भाऊंच्या उद्यानातील ऍम्फि थिएटरमध्ये करण्यात आले. याप्रसंगी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भालचंद्र पाटील, जे के चव्हाण, डॉ राधेशाम चौधरी, सिद्धार्थ बाफना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले.

याप्रसंगी महोत्सव प्रमुख अनिश शहा, अमर कुकरेजा, अनिल कांकरिया, छबिलदास राणे, डॉ रणजित चव्हाण, किरणभाई बच्छाव, नारायण बाविस्कर, राहुल निंबाळकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डाॅ. दिलीप पांढरपट्टे यांनी भवरलाल जैन यांच्या कार्याला वंदन करून परिवर्तनच्या महोत्सवाचा गौरव केला.

बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित ‘अरे संसार संसार’ हा सांगितिक कार्यक्रमात माहेर, अरे संसार संसार, माही माय सरसोती, सुगरीणीचा खोपा , आखाजी अशी अनेक गाणी परिवर्तनच्या कलावंतांनी सादर केला. सुदिप्ता सरकार, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर यांनी आपल्या मधुर आवाजात गाणी गायली. बहिणाईच्या कविता नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, प्रतिक्षा कल्पराज, मंगेश कुलकर्णी, उर्जा सपकाळे, सद्धी शिसोदे, सोनाली पाटील यांनी सादर केल्या. तर मनीष गुरव, योगेश पाटील, बुद्धभूषण मोरे, सुयोग गुरव, चंद्रकांत इंगळे, यांनी सहभाग घेतला.

बहिणाबाईच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया, त्यातील गोडवा, बोलीभाषेतील सौंदर्य, जळगावची संस्कृती आणि कवितेतील तत्वज्ञान शंभू पाटील यांनी उलगडून दाखवले. परिवर्तनची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर मागणी आहे.

कृषीधनाने महोत्सवाचे उद्घाटन

कृषी परंपरेशी भवरलाल जैन यांचं अतुट नातं होतं. आणि याच कृषीजन संस्कृतीमधील वस्तूंना हाती घेत भाऊंना भावांजली महोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यात कापुस, केळीचे खांब व घड, धान्याचे कणीस, पांभरी, कुदळ, पावडी, विळा हे कृषीधन मान्यवरांच्या हाती देऊन या धनाला वंदन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्धभूषण मोरे यांनी भवानी आईचा गोंधळ सादर करून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *