रमाई आवास योजनेअंतर्गत भूमिहीनांना मिळाले हक्काचे घर

बारामती, दि. १६ –  इंदापूर तालुक्यातील मौजे शेटफळगढे हे बारामती भिगवण रस्त्यानजीक वसलेले ५ हजार लोकसंख्यचे  गाव आहे. गावात भूमिहीन नागरिकांची संख्या अधिक आहे. गावात स्वत:च्या मालकीचे घर नसल्याने निवासाची समस्या नेहमीचीच. काही कुटुंब गावातील रस्त्याच्या कडेला झोपडीवजा घरात  वास्तव्य करीत. सुरक्षेच्या दृष्टीने  अशा ठिकाणी राहणे कठीण होते. एकीकडे भूमिहीन  तर दुसरीकडे नोकरी नसल्याने मोलमजुरी करुन कुटुंबाचे पोट भरावे लागत असल्याने स्वत:च्या घराचे स्वप्न  प्रत्यक्षात उतरविणे खूपच अवघड होऊन जाई.

अशा परिस्थितीत पंचायत समिती इंदापूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेतून दहा भूमिहीन कुटुंबांना घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्यासाठी या दहाही कुटुंबाकडे स्वत:ची जागा नव्हती. घरकुल मंजूर होऊनही जागा नसल्यामुळे खूप मोठा पेच निर्माण झाला. अशातच ही दहा भूमिहीन कुटुंबे एकत्र आली. शासनाच्या योजनेची त्यांनी ग्रामपंचायतीमधून  माहिती घेतली. पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेतून त्यांनी दहा घरकुलासाठी ११ गुंठे  मोकळी असलेली जागा गावातच खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि ग्रामसेवक यांनी खरेदी करावयाच्या जागेची पाहणी करुन बांधकामाची आखणी करुन दिली व तांत्रिक मार्गदर्शन करुन योजनेच्या लाभाची माहिती करुन दिली. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रत्येकाला १ लाख, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीचे १८ हजार व शौचालय बांधण्यासाठी १२ हजार व पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून  जागेच्या मुल्यानुसार ३७ हजार ५०० असे सर्व मिळून  प्रत्येक लाथार्थ्यांच्या बँक खात्यात १  लाख ६७  हजार ५०० रुपये जमा झालेत.

अकरा गुंठे जागा खरेदीसाठी प्रत्येक लाभार्थ्यांना ५५ हजार रुपये इतका खर्च करावा लागला. शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबांने स्वत:कडील १ लाख रुपये खर्च केले. त्यामुळे या सर्व  कुटुंबांना शासकीय योजनेतून हक्काचे घर मिळाले.  स्वत:कडील काही रक्कम खर्च केल्याने आवश्यक सोयी असलेले स्वप्नातील घर बांधणे त्यांना शक्य झाले.  या लाभार्थ्यांचे  एकाच  संकुलात घर असून त्या ठिकाणी  रस्ते, वीज, पाणी व सांडपाणी व्यवस्था  इत्यादी  मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

हक्काचे घर मिळाल्याचा आनंद या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर  पहायला मिळतो.  रस्त्याच्या कडेला असुरक्षित जीवन जगण्याऐवजी स्वत:च्या घरात सन्मानाने राहता येत असल्याचे समाधानही त्यांना आहेच.

गावात ही भूमिहीन कुटुंबे गावातील रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये अतिक्रमण करुन खूप वर्षापासून राहत होती. अतिक्रमण काढण्यापेक्षा त्यांची समस्या दूर व्हावी यासाठी योजनेची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनीदेखील सहकार्य केल्याने त्यांचे चांगले घर उभे राहिले आहे. त्यांना मुलभूत सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे शेटफळगढेचे  ग्रामसेवक सचिन पवार यांनी सांगितले.

खूप दिवसापासून आम्ही पक्क्या घरासाठी प्रयत्न करीत होतो. कमाई जास्त नसल्याने ते शक्य नव्हते. रमाई आवास योजनेमुळे आज आम्हांला स्वत:चे घरकुल मिळाले. आज स्वत:च्या घरात सुरक्षीत जीवन जगतोय याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे.  आमचं स्वप्न पूर्ण झाले असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *