नांदेड प्रतिनिधी ,दि.१६ : नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेला साईनाथ ननोभा जोगदंड या जम्मू येथील मुलाचा नेमबाजी मध्ये भारताच्या ज्युनियर राष्ट्रीय चाचणी संघात समावेश झाल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व डॉ. यशवंत चव्हाण यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
जर्मन वकालतीत कार्यरत असणारे आयएएस डॉ. सुयश यशवंत चव्हाण यांच्या विवाहानिमित्त नांदेडचे वऱ्हाड जम्मू येथे गेले होते. नांदेड तालुक्यातील पिंपरी महिपाल येथील ननोभा जोगदंड हे अठरा वर्षापासून जम्मु येथे स्थायिक झाले असून त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टर शिप मध्ये आपला जम बसवला आहे. नांदेड येथील रहिवाशांना जम्मू येथे मदत करण्यात जोगदंड हे तत्पर असतात. दिलीप ठाकूर यांच्या अमरनाथ यात्रेत जम्मू ची सर्व जबाबदारी जोगदंड हे यशस्वीरित्या दरवर्षी पूर्ण करतात. त्यांचा मुलगा साईनाथ याने ऑलिंपिक विजेता अभिनव बिंद्रा यांची प्रेरणा घेऊन रायफल शूटिंग मध्ये कॅरियर करण्याचा निश्चय २०१८ मध्ये केला होता. अवघ्या तीन वर्षात मिशन ओलंपिक शूटिंग अकॅडमी जम्मु येथे त्याने प्रशिक्षण घेऊन टेन मिटर एयर रायफल या प्रकारात प्राविण्य मिळविले आहे. रायफल शूटिंग मध्ये साईनाथ ने विविध स्पर्धांमध्ये अनेक मेडल पटकावले आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जूनियर नेमबाजी स्पर्धेच्या चाचणीमध्ये तो उत्तीर्ण झाल्यामुळे भविष्यात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी लाभणार आहे. नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र असणारा साईनाथ जोगदंड याच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिलीप ठाकूर डॉ. यशवंत चव्हाण भास्कर चव्हाण, प्रा. सुधाकर कौसले, उत्तम चव्हाण माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, नायगावच्या सहशिक्षिका गंगासागर चव्हाण यांनी जम्मू मुक्कामी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच साईनाथ जोगदंड ला पुढील कारकिर्दीसाठी नांदेड वासियांतर्फे शुभेच्छा दिल्या.