महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा

रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरावा

नाशिक , दिनांक २० डिसेंबर : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा घेतांना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विविध विकास योजनांकरिता उपलब्ध निधीचा खर्च तसेच जिल्ह्यातील घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात यावे. यासोबतच स्मशान भूमी, शाळा व अंगणवाडी यांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन लाभार्थी योजनेंतर्गत भूमिहीनांना सरकारी, गायरान आणि महामंडळाच्या जमिनीतून जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

ग्रामपंचायत विभागाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन जाणून घेऊन, २०२०-२१, २०२१-२२ यावर्षीच्या जिल्हा नियोजनातील उत्कृष्ट कामकाज व २११ अनुकंपा पदांची भरती, मुख्याध्यापक पदोन्नती आणि सर्व सेवा जेष्ठता याद्यांच्या प्रारूप यादी १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करणे, जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी राबविलेल्या ‘एक मूठ पोषण’ या कामांचे ग्रामविकास मंत्री यांनी कौतुक केले. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने ग्रामीण भागात पाझर तलावांचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्याकरिता सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *