मुंबई, दि. २४ : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील स्वजलधारा अभियानाअंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीसंदर्भात तारांकित प्रश्न विधासभा सदस्य राजेश पवार, रवींद्र वायकर यांनी उपस्थित केला होता.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सध्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात एकूण १३ योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यातील आठ योजनांची कामे बंद आहे. उर्वरित पाच योजनांच्या कामांद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच पाणीपुरवठा नियमित होत नसलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत येत्या एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल तसेच चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल.