धारावी येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबई, दि. २६ : खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन धारावी येथे छापा घालून बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.

याठिकाणी १६५ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ११७ विविध प्रकारच्या विदेशी मद्याची बुचे, १२६ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या टोप्या ( कॅप्स), ४० अँबसेल्यूट व्होडकाचे टोपन, विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याची लेबले, एक ड्रायर मशीन, तीन टोचे, तीन फनी, एक मार्कर, तीन टूथ ब्रश, एक बॅग सँग व १२ मोठ्या प्लॉस्टिक गोण्याचा इत्यादी साहित्यासह एकूण रुपये ३ लाख ७० हजार ३९० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये कल्पेश भरत वाघेला याच्यासह तीन आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक २८ डिसेंबर २०२१ पर्यंत एक्साईज कोठडीचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप,  विभागीय उप आयुक्त, ठाणे सुनिल चव्हाण, संचालक (अं.व द) श्रीमती उषा वर्मा  तसेच राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ मुंबई शहर कार्यालयाने केली असून विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या मद्याचा साठा स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री आपल्या ओळखीच्या लोकांना  करण्याचा उद्देश होता. या कारवाईमध्ये श्रीमती प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर व अविनाश पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग मुंबई शहर, आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर, व जवान जी. डी. पवार, प्रविण झाडे, विनोद अहिरे, बालाजी जाधव, श्रीमती महानंदा बुवा यांनी सहकार्य केले.

या गुन्ह्यातील तपास अधिकारी विनोद शिंदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००११३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *