अंबाजोगाई/बीड, दि. २६ :- राज्य सरकारच्या माध्यमातून अंबाजोगाई पंचायत समितीचे सर्व सोयीसुविधायुक्त असे पंचायत समितीचे कार्यालय उभे राहिले आहे. हे कार्यालय म्हणजे ग्रामीण माणसाचे प्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या ठिकाणी आलेल्या ग्रामीण माणसाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट या होत्या. तसेच आ.संजय दौंड, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जि.प.चे उपाध्यक्षा बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, माजी आ.पृथ्वीराज साठे, जि.प.सदस्य राजसाहेब देशमुख, जि.प.सदस्य शंकर उबाळे, नगरसेवक बबन लोमटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना या लोककल्याणासाठी बनविलेल्या असतात. त्या योजना लोकांपर्यत पोहचल्या पाहिजेत यासाठी शासन आणि प्रशासन यांचे सहकार्य महत्वाचे असते. पंचायत समितीचे कार्यालय म्हणजे ग्रामीण माणसाच्या अपेक्षांचे केंद्र आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या घटकातील माणूस येतो. त्या माणसाच्या अपेक्षा पूर्ण होवून त्याला समाधान वाटले पाहिजे असे काम उभे केले पाहिजे. मागच्या दोन वर्षात बीड जिल्हा मागासलेपणातून बाहेर येत असून विकासाचे पर्व या ठिकाणी सुरु करण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. आणि खर्या अर्थाने विकासाचा कळस चढवण्यासाठी माझा हातभार लागतोय. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने जिल्ह्यासाठी व विशेषतः अंबाजोगाई व परिसरातील रुग्णांच्या काळजीसाठी तातडीने करोडो रुपयांचा निधी दिला. जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असून येत्या दोन वर्षात नगर पासून सुटणारी रेल्वे परळीपर्यंत येणार यात कसलीही शंका नाही. शिवाय परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील माणूस हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी २.८३ टिएमसी पाण्याची उपलब्धतता होणार आहे. त्यासाठी ११ साठवण तलावाची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी ३ तलाव हे अंबाजोगाई तालुक्यातील असणार आहेत. बीड जिल्हा व संपूर्ण ग्रामीण भागातील माणूस हा स्वंयपूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. बीड जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रश्न पुढच्या काळात मार्गी लावण्यात येणार असून याप्रक्रियेमध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सामान्य माणसांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. येणार्या काळात अंबाजोगाई-घाटनांदुर ही रेल्वे सुद्धा धावतांना दिसेल. असे मनोगत व्यक्त केले.
शासनाच्या योजना या प्रभावीरित्या अंमलात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याची अपेक्षा श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत पं.स.सभापती विजयमाला जगताप, उपसभापती श्रीमती अलिशान पटेल, माजी सभापती सौ.मिना शिवहार भताने, माजी उपसभापती तानाजी देशमुख, गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोनसीकर, उपअभियंता प्रभाकर नागरगोजे यांच्यासह इतरांनी केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोनसीकर यांनी केले, तर संचलन व आभार गोविंद केंद्रे यांनी मानले. यावेळी कंत्राटदार मनोज गित्ते यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामीण भागातील अनेक सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्य कर्मचारी, कृषि कर्मचारी व इतर उपस्थित होते.