अमरावती, दि. १ : नववर्ष उगवत असतानाच पुन्हा कोविडबाधित वाढत असल्याचे दिसत आहे. संकट समोर उभे ठाकले आहे. मात्र, तपासणी, ट्रेसिंग, लसीकरण व दक्षता घेत आपण खंबीरपणे त्याला सामोरे जाऊया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आज केले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आपण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यालाही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यातला मोठा काळ कोरोनाशी लढण्यात गेला. आरोग्याच्या अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. नागरिकांचे आरोग्य जपणे हेच सर्वोच्च प्राधान्य असून, यापुढेही तसा प्रयत्न राहील.
त्याचप्रमाणे, नव्या क्षेत्रातही काम करायचं आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला विविध योजना- उपक्रमांतून अधिक समृद्ध करण्याचा संकल्प आहे. शक्ती कायद्याने कायदेशीर ताकद दिली आहे. त्यासोबतच आता लोकजागरणही गरजेचे आहे. लडकी हूँ, लड सकती हूँ ही भावना प्रत्येक मुलीने बाळगून खंबीरपणे प्रत्येक संकटावर मात करत पुढे जाण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्यासाठी व्यापक लोकजागरण राबवावयाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.