कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

कोल्हापूर, दि.४ जानेवारी २०२२: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ (कृती आराखडा) तयार करुन त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावार, जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या लाटेतील संख्येच्या दीडपट रुग्ण म्हणजे जिल्ह्यात तिसऱ्या लाटेमध्ये साधारण २४ हजार रुग्णसंख्या होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक ती तयारी करा. कोरोना बाधितांचा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी तपासण्यांची संख्या वाढवा.  गृह विलगीकरणाद्वारे संसर्ग वाढू नये, यासाठी याठिकाणी नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करा.  समाजमंदिर, सार्वजनिक सभागृहांचा वापर संस्थात्मक अलगीकरणासाठी करण्याच्या दृष्टीने नियोजन करा. बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन तपासण्यांची संख्या वाढवा. बाधित रुग्णांची संख्या वाढली तरीदेखील सर्व रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळवून देता येण्यासाठी पुरेसे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड तयार ठेवा. पुरेसा औषधासाठा व वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध ठेवा, अशा सक्त सूचना देवून मनुष्यबळ, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे सांगून शहर परिसरातील कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांबाबत संबंधित विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांना केल्या. १५ ते १८ वर्ष वयोगटातील १०० टक्के युवकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या वयोगटातील एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्या नागरिकांशिवाय अद्याप पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांची गाव निहाय माहिती घ्यावी. अशा नागरिकांना डोस देण्यासाठी यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात ऑक्सिजन विरहित ११ हजार तर ऑक्सिजन युक्त ४ हजार बेड तयार आहेत. शासकीय व खासगी असे ४०४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तसेच १८५ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता सध्या उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन वैद्यकीय सेवा सुविधा तयार करण्यात आल्या असून कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *