सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी
पुणे, दि.०४/१ /२०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर उभारण्यात येत असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
श्री. भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे येत्या आठवड्यात अनावरण करण्याचा मानस असून त्यासाठी पुतळा उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. पुतळा अनावरण प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
चबुतऱ्यावर पुतळा उभारणीचे प्रारंभीक काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामातही दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करण्यात यावा. पुतळा परिसरातील सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी, असे सांगत ऐतिहासिक अशा विद्यापीठाच्या वारसा (हेरिटेज) इमारतीच्या दगडकामाशी सुसंगत असे पुतळ्याचे चबुतऱ्याचे दर्शनी भागातील काम करण्यात यावे, यासह विविध सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संजीव सोनवणे, प्रा.हरी नरके, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, निबंधक डॉ. प्रफुल्ल पवार, मुक्त व दूरस्थ प्रशाला संचालक प्रा.वैभव जाधव, मराठी विभागप्रमुख प्रा. प्रभाकर देसाई, इतिहास विभागप्रमुख प्रा. बाबासाहेब दुधभाते, ईश्वर बाळबुधे, बापू भुजबळ, प्रित्येश गवळी आदी उपस्थित होते.