सोलापूर, दि.०८ :- सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३७३ प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात. या सर्व प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वनराज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्याने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित तीन दिवसीय ३४ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वन अधिकारी मनिषा पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, उजनी, हिप्परगा आणि कुरनूर धरण या ठिकाणांसह जिल्ह्यात पक्ष्यांच्या ३७३ प्रजाती, फुलपाखरांच्या १०० प्रजाती तर वन्यप्राण्यांच्या ३० प्रजाती आढळतात. शासनाकडुन गवत लागवड कार्यक्रम, पाणवठे तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे जैव विविधता वाढत आहे, असेही माहिती त्यांनी दिली.
निसर्गनिर्मित, मानवनिर्मित संकटांमुळे पक्षी धोक्यात येत आहेत. यावर उपाय म्हणून पक्षीमित्र कार्य करतात. पक्ष्यांसाठी तालुका पातळीवर रेस्क्यू सेंटर व्हावे अशी मागणी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा यांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली.
पक्षीमित्र संमेलनात आज दोन कार्यशाळा झाल्या. जखमी पक्ष्यांवर उपचार आणि निगा कशी राखावी या विषयावरील कार्यशाळेत डॉ. शिवानी तांडेल (मुंबई), डॉ. संजय गायकवाड (नाशिक) आणि राजकुमार कोळी (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. तांडेल म्हणाल्या, जखमी पक्षी आढळला की त्याच्या शरीरात पाणी गेले आहे का, श्वास नीट घेत आहे ना, रक्तस्त्राव झाला आहे का ही प्राथमिक पण अत्यंत महत्वाची माहिती डॉक्टरांना द्यावी. पक्षी हे जैव विविधतेचे प्रतिके आहेत.
डॉ. गायकवाड म्हणाले, जखमी पक्ष्यावर उपचार केल्यानंतर तो उडू शकत असेल तर त्याला लगेच निसर्गात सोडावे. जर त्याला खूप दिवस आपल्याकडे ठेवले तर नैसर्गिक खाद्य न मिळाल्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. राजकुमार कोळी म्हणाले, सोलापूर शहर आणि परिसरात सुमारे २५० प्रकारचे पशू-पक्षी आढळतात. मांजा, प्लास्टिक, कीटकनाशक औषधे यांच्या अधिक वापरामुळे पशू-पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय व्हावे असे श्री कोळी यांनी सुचित केले.
तसेच फोटो एडिटिंग कार्यशाळेत बंगळुरू येथील अनंत मूर्ती, आनंद मादास, अरुण सामक यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक अधिवासातील पशू पक्ष्यांचे फोटो कसे घ्यावेत, ते संपादित कसे करावेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविक केले व पक्षी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगितले. श्री. भानप यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.