पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण

नांदेड (जिमाका) दि.०९:- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व त्यांना आवश्यक त्या भौतिक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वाटप पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. तृतियपंथ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी गौरी बक्ष व इतर सहा तृतियपंथ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच नांदेड येथे किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या सोई-सुविधेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यावेळी दिली.

समाज कल्याण विभागाच्या samajkalyannaded.in या वेबसाईटचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामुहिक योजना या ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.

समाजकल्याण विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यात पुढील पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे नियोजन संक्षिप्त स्वरुपात नमूद करण्यात आले. यासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, डी. आर. दवणे, रामदास पेंडकर, अमरदीप गोधणे यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *