किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षण व पाटबंधारेच्या कामांना प्राधान्य – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. ०९ :-  डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मंजूर असून या पैकी २ कोटी रुपयांचा  निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून किनवट व माहूर तालुक्यातील शाळा बांधकाम-दुरुस्तीची व पाटबंधारेची कामे प्राधान्याने करावीत असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.  डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज डोंगरी विकास समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते.

डोंगरी भागातील गावात रस्ते, नाली बांधकाम व इतर विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डोंगरी भागातील नदी-नाल्याच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व पुरात होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी कोकणाच्या धर्तीवर पायी चालण्यासाठी राज्यात गरज असेल तिथे साकव उभे करण्याचा कार्यक्रम बविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे, समाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकर, समितीच्या अशासकीय सदस्य श्रीमती जनाबाई डुडुळे, सदस्य आशिष कऱ्हाळे, राहूल नाईक तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *