जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ च्या ५१२ कोटी ४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

नांदेड प्रतिनिधी, दि. ०९:- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन २०२२-२३ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१२ कोटी ४ लाख ७२ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, समिती सदस्य हरिहरराव भोसीकर, एकनाथ मोरे,  प्रकाश वसमते, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने हे प्रत्यक्ष तर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, आमदार डॉ. तुषार राठोड व नियोजन समितीचे इतर सदस्य हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सन २०२२-२३ च्या प्रारुप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ३०३ कोटी ५२ लाख ८० हजार, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १६३ कोटी, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी ४५ कोटी ५१ लाख ९२ हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय चालू वर्षातील पुनर्विनियोजन प्रस्तावात बचत ९ कोटी ११ लाख ५५ हजार असून मागणी ८६ कोटी २५ लाख ४९ हजार रुपयांची आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील कार्यान्वित यंत्रणाना वितरीत केलेला निधी माहे डिसेंबर २०२१ अखेर एकुण वितरीत तरतुद ८६ कोटी ६० लाख ३४ हजार रुपयांपैकी झालेला खर्च ६३ कोटी ५६ लाख २० हजार रुपये एवढा झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वितरीत निधी व खर्च झालेल्या निधीचा आढावा घेतला. ज्या विभागांनी अद्याप पर्यंत निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. निधी प्राप्त करुन मार्च २०२२ अखेरपर्यत १०० टक्के प्राप्त निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना यावेळी दिले.

 

सन २०२२-२३ च्या प्रस्तावित प्रारुप मागणी आराखडा व सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील मंजूर निधीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. जिल्ह्यात पशुच्या संख्येचे निकष ठरवून पशुवैद्यकीय दवाखाने उभारणी व अद्ययावतीकरण करण्यावर भर द्यावा. देगलूर नाका परिसरातील पशुवैद्यकीय दवाखाणा अद्ययावत करणे, जिल्ह्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांचे बांधकाम प्राध्यान्याने करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिले.  कोविड-१९ उपाययोजनेसाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवण्यात यावा. अनेक विभाग प्रमुखांनी प्रलंबित कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राप्त निधी मार्च अखेर खर्च करण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मागील १४ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास यावेळी मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. काळम यांच्यासह समिती सदस्य, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व  दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन व सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *