क्रांतिअग्रणी स्व. डॉ.जी.डी.बापू लाड – जीवन कार्य

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचा जन्म कुंडल, जि. सांगली येथे 4 डिसेंबर 1922 रोजी कष्टाळू शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे कृपाछत्र हरविल्याने आईने मोठ्या कष्टाने मुलांचे पालनपोषण केले. बापूंचे प्राथमिक शिक्षण कुंडल येथे झाले. या काळात घरच्या गरिबीमुळे त्यांना अनेक सामाजिक वाईट प्रथांचे चटके सोसावे लागले. त्यातून आपण पाटील असून देखील समाजातून आपल्याला दारिद्र्यामुळे अशी तुच्छ वागणूक मिळत असेल तर प्रत्यक्ष अस्पृश्यांना किती हीन दर्जाची वागणूक समाज देत असेल, याची जाणीव बापूंना लहान वयातच झाली. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील एकूण कार्यामध्ये आपणास दिसून येतो.

त्यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या निपाणी येथील शिक्का बोर्डिंगमध्ये झाले. ते मॅट्रिकची परीक्षा औंध येथील संस्थानच्या बोर्डिंगमध्ये राहून उत्तीर्ण झाले. त्यांनी पुण्याला आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दुसऱ्या वर्षाला असताना महात्मा गांधींनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यसत्तेने काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पुण्यात निघालेल्या प्रचंड मोर्चात ते आपल्या विद्यार्थी सहकाऱ्यांसह सहभागी झाले. त्या निःशस्त्र मोर्चावर ब्रिटिश पोलिसांनी लाठी हल्ला व गोळीबार केला. बापू त्यातून बचावले. त्यांनी आता देशाला स्वतंत्र करणे हेच आयुष्याचे ध्येय ठरवले. ते कॉलेजचे शिक्षण सोडून कुंडलला परत आले. कुंडलमध्ये त्यांनी युवकांचे संघटन केले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले. हा मोर्चे पर्वाचा कालखंड होता. तासगाव व इस्लामपूर तहसिल कचेरीवरील मोर्चाच्या प्रचारात व मोर्चात हिरिरीने सहभागी झाले. कराड व तासगावचे मोर्चे यशस्वी झाले होते. इस्लामपूर आणि वडूज येथील निशस्त्र मोर्चेकऱ्यांवर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये इस्लामपूर येथे दोन तर वडूज येथे सात मोर्चेकऱ्यांनी बलिदान दिले. ब्रिटिशांचा तो जुलमी गोळीबार पाहून बापू व त्यांच्या सहकाऱ्यांनी सशस्त्र ब्रिटिशांसी निशस्त्र लढा देऊन भारताला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहमतीने सशस्त्र लढ्याच्या उभारणीस प्रारंभ केला.

लढ्यासाठी शस्त्रे खरेदी आणि लढा चालविण्याचा खर्च यासाठी त्यांनी ज्यांच्याशी लढा द्यायचा त्यांचाच पैसा लुटण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग अवलंबला. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शेणोली येथे 19,000/- रूपये स्पेशल ट्रेनच्या व 5,50,000/- रुपये धुळे (चिमठाणा) येथे ब्रिटिशांचा खजिना लुटून निधी उभा केला. त्यातून गोव्याहून शस्त्रे खरेदी केली. तसेच पोलीसठाणी व खाजगी बंदुका धाडसाने लुटल्या.

त्या शस्त्रांच्या व निधीच्या आधारावर कुंडल येथे सैनिकी प्रशिक्षण केंद्र सुरु केले. त्यावेळच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील खेडोपाड्यातील हजारो युवकांना प्रशिक्षण देऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढ्यासाठी तयार केले. त्या प्रशिक्षित युवकांची तुफानसेना उभी झाली. त्या तुफानसेनेचे बापू फिल्डमार्शल झाले. या तुफानसेनेच्या माध्यमातून लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणींची सोडवणूक केली जाऊ लागली. विविध विधायक उपक्रमांची अंमलबजावणी होऊ लागली. त्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता चालविणारे भारतातील जमीनदार, सावकार, पाटील, गावगुंड, पोलीस खबरे यांच्या तावडीतून सामान्य जनतेची सुटका केली. सावकारांकडून लाखो रुपयांच्या हुंड्या घेऊन त्या त्या गावातील चावडीसमोर त्या जाळून गोरगरीब शेतकरी-कष्टकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्ती केली. स्त्रियांना संरक्षण दिले. त्यांची नांदणी सुरळीत केली. गावोगावी व्यसनमुक्ती, रात्रशाळा, वाचनालये, अस्पृश्यता निवारण, एक गाव एक पाणवठा यासारखे उपक्रम राबविले. शेरे गावातील कुळांना कसण्यासाठी जमीनदाराची जमीन कसणाऱ्यांच्या नावावर कायदेशीररित्या करून दिली. कवठेएकंद ता. तासगाव येथे चोऱ्या, दरोडे, दारूचा गुत्ता चालविणाऱ्या समाजाला एकत्र करून त्यांना बुधगाव संस्थानची जमीन कसण्यासाठी उपलब्ध करून दिली. त्यांना गैर उद्योगापासून परावृत केले. दरोडेखोरांची असणारी गावोगावची बंडे मोडून काढली. यासारख्या उपक्रमांतूनच नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसरकारची स्थापना झाली.

तुफान दलाचे कार्य इतके वाढले की, त्यांच्या मदतीसाठी भूमिगतांचे मध्यवर्ती मंडळ, आघात दल आणि तुफान दल अशी रचना करण्यात आली. बापूंच्या नेतृत्वाखाली गावोगावी जनताकोर्ट घेण्यात येऊ लागली. त्यातून गोरगरिबांवरच्या अन्यायाचा सर्वांच्या साक्षीने न्याय निवाडा होऊ लागला. दोषींना कठोर शिक्षा होऊ लागली. त्यातूनच काही जणांना पत्री मारण्यात आली. त्याचा अन्याय-अत्याचार करणाऱ्या गावगुंडांनी इतका धसका घेतला की, त्यांनी शरणागती पत्करली.

बापूंच्यावर इंग्रजी सत्तेने रोख बक्षिस लावले होते. त्यांच्यावर गोळीचा हुकूम होता. अशा काळात बापूंनी इंग्रजीसत्तेच्या उरावर आपला विवाह प्रतिसत्तेला ताकद देईल अशा क्रांतिकारी पद्धतीने संपन्न करण्याचा निर्णय घेतला. बापूंना समर्थपणे साथ देणाऱ्या विजयाताई यांच्याशी मध्यरात्री हजारो तुफानसैनिकांच्या उपस्थितीत वधूवरांनी एकमेकांचे अंगठे चिरून रक्ताचे टिळे लावून गांधी पद्धतीने विवाह पार पडला. आसपास 500-600 सशस्त्र पोलीस असताना त्यांना कोणतीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे इंग्रजी सत्तेला एक प्रकारे शह देणारा हा विवाह स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारा ठरला.

यातून लोकांना प्रतिसरकार हे इंग्रजापेक्षा ताकदवान असल्याची जाणीव झाली. मोठ्या प्रमाणावर लोकांचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग वाढला. त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग देखील मोठा होता. दक्षिण सातारा जिल्ह्यामधील प्रतिसरकार प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिसरकारची व्याप्ती वाढविण्यासाठी बापूंनी महाराष्ट्रातील विविध भागात तालीम संघ, युवक संघटना स्थापन करायला सुरूवात केली. बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, नागपूर, कुर्ली आप्पाचीवाडी यासारख्या ठिकाणी तालिम संघ वा युवक संघटना स्थापन केल्या. मुंबईला 40,000 सातारी कामगारांचा संघ स्थापन केला. याच काळात त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. तेथील सहकाऱ्यांच्या मदतीने आझाद गोमंतक दलाची स्थापना केली.

1946 साली ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य घोषित केल्याने प्रतिसरकारची चळवळ थंडावली. पण जी डी. बापू स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी मराठवाड्यातील थंडावलेल्या रझाकार विरोधी आंदोलनासाठी मराठवाड्यात अनेक ठिकाणी लष्करी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करून तो लढा जिवंत केला. त्यासाठी प्रतिसरकारच्या लढ्यातील सरकार जमा न केलेली शस्त्रे व पुन्हा त्या लढ्यासाठी म्हणून जमा केलेली शस्त्रे यांच्या माध्यमातून रझाकारांच्या अन्याय-अत्याचाराला रोखले. मराठवाड्यातही इरले या गावी प्रतिसरकारची स्थापना केली. हे सर्व घडत असतानाच भारत सरकारने लष्करी कारवाई करून हैद्राबाद संस्थान भारतात विलिन करून घेतले. त्यामुळे तो लढाही संपला.
परंतु ज्या गरिबांच्या न्याय्य हक्कासाठी स्वातंत्र्य मिळविले, ते स्वातंत्र्य अजून शेतकरी-कष्टकऱ्यांपासून कोसो मैल दूर आहे हे ओळखून बापू स्वराज्याचे स्‍वुराज्य करण्यासाठी दुसऱ्या क्रांतीची आवश्यकता आपल्या सहकाऱ्यांना पटवून सांगू लागले. त्यासाठी बैठका, गाठीभेटी घेऊ लागले. त्यावेळच्या मुंबई सरकारने शस्त्रास्त्रे जमवून सरकार विरुद्ध कट केल्याचा आरोप ठेवून बापूंवर अटक वॉरंट काढले. कराड येथे शेकाप पक्षाच्या मिटिंगसाठी उपस्थित असताना रात्रीच्यावेळी केशवराव पवार यांच्या घराला पोलिसांनी गराडा घातला व बापूंना हवाली होण्यासंबंधी निरोप दिला. परंतु, पक्षाच्या त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे बापू पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. पण थोड्याच दिवसात बापूंचा पोलिसांना ठावठिकाणा समजल्याने त्यांना शेंदूरजणे येथे प्रवाशी बसची वाट पहात असताना संगीनधारी बंदुकांचा गराडा घालून पोलिसांनी त्यांना साखळदंडांनी जखडून अटक केली. बापू दोन वर्षे येरवडा, सांगली आणि नाशिक येथील जेलमध्ये होते. त्यावेळी त्यांनी समाजवादाचा मुळापासून अभ्यास केला.

सुटका झाल्यानंतर बापूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात धडाडीने सहभाग घेतला. 1957 साली ते विधानसभेवर निवडून गेले. 1962 साली शेकापचे विधानपरिषद सदस्य झाले. विधानसभा व विधान परिषदेमध्ये ठाम मते मांडली, त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, वंचित जनतेला न्याय्य हक्क मिळावेत म्हणून त्यांचे संघटन करून मोर्चे, आंदोलने, धरणे आदी मार्गाने संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर दाम मिळावा, महागाई कमी करावी, सर्वांना मोफत व जगण्यास उपयुक्त ठरणारे रोजीरोटी मिळवून देणारे शिक्षण मिळावे हा सरकारकडे आग्रह धरला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बापूंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कुंडल येथे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह व गांधी एज्युकेशन सोसायटीची स्थापना प्रतिसरकारच्या चळवळीतील राहिलेल्या निधीतून केली. 1972 च्या महाराष्ट्रव्यापी दुष्काळामध्ये बापूंनी शेतकरी, शेती कष्टकरी यांचे झालेले हाल पाहून कुंडल व परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापन केल्या व इथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांनी रचनात्मक कार्यास प्रारंभ केला. सहकाराचे सर्वत्र खाजगीकरण चालू असताना जी. डी. बापू यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून तो पारदर्शक व काटकसरीने चालवून अल्पावधीत कर्ज मुक्त केला. अल्पावधीत राज्य व देशपातळीवरील विविध क्षेत्रातील पुरस्कार कारखान्याला मिळवून दिले आणि सहकारामधील एक नवा आदर्श तयार केला. इरिगेशन फेडरेशनची स्थापना करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माफक दराने पाणी, वीज, खते, बी-बियाणे आदी उपलब्ध व्हावे म्हणून सामूहिक संघर्ष केला व अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या तुफानसेनेचे सरसेनापती व अनेक रोमहर्षक प्रसंगात त्यांनी भागीदारी केली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, हैद्राबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सारख्या लढ्यातील ते एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. तसेच कष्टकरी, शेतकरी वंचिताच्या न्याय्य हक्कासाठी अखेरचा श्वास घेईपर्यंत ते संघर्ष करत राहिले. अशा या संघर्षयात्रीचा स्वातंत्र्य आंदोलनातील अतुलनीय कार्याबद्दल 9 ऑगस्ट, 2003 रोजी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील योगदान व स्वातंत्र्यानंतर गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा गौरव करण्यासाठी 12 मार्च, 2011 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तर्फे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत व कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते डिलीट या मानद पदवीने गौरव करण्यात आला. बापूंची जीवनयात्रा 14 नोव्हेंबर 2011 रोजी थांबली. परंतु त्यांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी क्रांतिअग्रणी विचार व कार्यशकी सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

श्री. अरूण गणपती लाड

आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *