महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

मुखेड व भोकर डेमो हाऊसचे ऑनलाईन उद्घाटन

नांदेड प्रतिनिधी, दि. १२ :- ग्रामीण भागातील स्वत:च्या घरापासून वंचित असलेल्या नागरिकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळावे यासाठी महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. यादृष्टीने ज्या विविध योजना आहेत त्यात परस्परपूरक स्मन्वय साधत सूक्ष्म नियोजन करून त्याला अधिक प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाआवास अभियान-२ कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे व्ही. आर. पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयामध्ये किफायतशीर गृहनिर्माणावर भर दिला आहे. राज्य शासनानेही यावर भर देऊन उपलब्ध असलेल्या आवास योजना अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय घरकुलाची मागणी लक्षात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांनी पुढाकार घेऊन अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. मागणीप्रमाणे अधिक उद्दीष्ट निर्धारीत केले पाहिजे. याचबरोबर जी घरकुलाची कामे हाती घेतली आहेत ती अधिकाधिक गुणत्तापूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कामाच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता यावी यादृष्टिने ही कार्यशाळा महत्वपूर्ण असून तालुकास्तरावर संबंधित यंत्रणा व लाभार्थी यांच्या समन्वयासाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.

कमी किंमतीत कसे घर बांधता येते हा विश्वास ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाकडून डेमो हाऊसची उभारणी भोकर व मुखेड तहसिल कार्यालय परिसरात करण्यात आली आहे. या दोन डेमो हाऊसचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाआवास योजनेंतर्गत माहितीचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरवण्यात आले होते. सुरुवातीला या प्रदर्शनास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देऊन माहिती घेतली.

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजनेत केलेल्या कामाचे दिलेले उद्दिष्ट, मंजूर घरकुल त्यापैकी पूर्णत्वास आलेल्या घरकुलाच्या कामाची माहिती त्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *