अमरावती जिल्ह्यात पर्यटनविकासाला मिळणार गती ‘स्काय वॉक’ विकासातील सर्व अडथळे दूर होणार

अमरावती, दि. १४ : चिखलदरा येथील स्काय वॉकच्या विकासातील सर्व अडथळे दूर करण्यात येणार असून, लवकरच हे काम गती घेईल. त्याबाबत आणि जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांना निधी मिळवून देण्याबाबत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली असून, अमरावती जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यास चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांतील प्रलंबित बाबी, पर्यावरणविषयक परवानगी आदी प्रक्रिया, विविध पर्यटनस्थळांचा विकास, आवश्यक निधी याबाबत पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे व पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीला अमरावती येथून अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘स्काय वॉक’चे काम मार्गी लागणार

चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक परवानगी व इतर प्रक्रिया गतीने राबविण्यात येईल. एक महत्वाची पर्यटन सुविधा याद्वारे निर्माण होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबींसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच जिल्ह्यातील केकतपूर, शेवती, संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यासाठी पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व अमरावती जिल्ह्यात पर्यटनाबाबत विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील विविध स्थळांच्या विकासासाठी मिळणार निधी

जिल्ह्यातील विविध स्थळांच्या विकासासाठी निधी वितरीत करण्याबाबतही पर्यटनमंत्र्यांनी आश्वासित केले.  शहराच्‍या मध्यवस्‍तीत शिवटेकडी असून त्‍याठिकाणी शिवसृष्‍टीची उभारणी करण्‍याबाबत नियोजित आहे. त्याबाबत तीन कोटी रूपये निधीची मान्यता प्राप्त आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० लाख निधी प्राप्त झाला. तसेच उर्वरित निधी मिळावा, तसेच वडाळी येथे ब्रिटीशकालीन तलाव असून, त्याठिकाणी उद्यानही विकसित आहे. लगतच बांबू गार्डन हे पर्यटनस्थळ विकसित आहे. एस.आर.पी.कॅम्‍प, वनविभाग व महापालिका यांच्‍या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या भूभागावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान निर्माण करण्याचे  नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. आवश्यक तो सर्व निधी मिळवून दिला जाईल, असे पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी आश्वासित केले.

केकतपूर, शेवती, संगमेश्वर, कौंडण्यपूर आदी अनेक स्थळांसाठी निधी

जिल्ह्यातील केकतपूर व शेवती येथील पर्यटन विकासकामांसाठी १० कोटी, संगमेश्वर येथील पर्यटन विकासासाठी 5 कोटी, याबरोबरच धामोरी येथील कामांचा उर्वरित निधी मिळावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भपीठ, धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिर संस्थान, नांदगाव पेठ येथील शारदुल बाबा दर्गा आदी ठिकाणी पर्यटन विकासासाठी निधी व प्रादेशिक पर्यटन योजनेत अंतर्भूत अचलपूरमधील सरायपुरा येथील कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. या

विविध महत्वाच्या स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून, अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्यामुळे लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला अमरावती येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे  जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *