कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा

बुलडाणा, दि. १९ : कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात. चाचण्यांच्या सुविधा वाढवून तातडीने चाचणीचे अहवाल मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सर्वश्री अभिजीत नाईक, अनिल माचेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सक्रिय रूग्ण व कोविड संसर्गीत रूण्गाांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, अशा रूग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यास तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा. यंत्रणेने ऑक्सिजनचा साठा व पुरवठा, मागणी याबाबत अद्ययावत रहावे. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेवून तपासणी करावी. लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी. तसेच दुसरा डोस आलेल्या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता दुसरा डोस घ्यावा. रूग्णवाढ लक्षात घेता पर्याप्त औषधीसाठा ठेवावा. औषधांची कमतरता पडायला नको.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.  मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध पोलीस विभागाने कारवाई करून दिवसा जमावबंदी व  रात्री संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. ओमायक्रॉन या नविन व्हेरींएंटचे रूग्ण असल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची तपासणी करून घ्यावी.

सध्या १७ पीएसए प्लँट, ४ एलएमओ प्लँट व ४५ ड्युरा सिलेंडर मधून ९९.९० मे.टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील ४९ हजार ६१५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *