नांदेडप्रतिनिधी, दि. ०३- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते रमेश देव यांच्या निधनामुळे एक दिग्गज सदाबहार रंगकर्मी हरपला आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रमेश देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, रमेश देव यांनी हिंदी व मराठी चित्रसृष्टीतील असंख्य भूमिका समर्थपणे साकारल्या होत्या. ते घराघरात सुपरिचित असलेले अभिनेते होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग मला अनेकदा लाभला. ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हे तर सामाजिक संवेदना जपणारे एक सहृदयी व्यक्तीमत्व देखील होते. त्यांचे निधन चाहत्यांसाठी एक मोठा धक्का आहे. ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील, असे नमूद करून श्री. अशोक चव्हाण यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.