बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासह विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार पाठीशी

  • बीड येथील १०० कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण 

  • जिल्ह्यात दर्जेदार कामे करून दाखवू, जिल्ह्याला अर्थमंत्री या नात्याने झुकते माप द्या – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. ०९ :- राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी घेतली गेली. निधीची चणचण असूनही आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारकाईने काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

बीड येथे १०० कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे संपन्न झाले. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.

दोन वर्षाच्या काळात कोरोना संकटाच्या काळात देखील राज्याने दिला जिल्ह्यात मोठा विकास निधी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून ३६० कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास २० कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांत साठी विकास निधी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोदक मोठ्या प्रमाणात तरतूद असा विविध योजनातून विकास निधी दिला गेला आहे.

केंद्र सरकार सारखे राज्यांना नोटा छापायला अधिकार नसल्याने राज्याच्या उत्पन्नातून हा निधी दिला जातो. बीड शहरासाठी अमृत योजनेतून दोन पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यास पाण्याचे प्रश्न सुटू शकेल परंतु नगरपरिषदेचे वीज बिल थकीत आहे. आर्थिक शिस्त देखील लागण्याची गरज आहे यावर उपाय काढण्यासाठी प्रशासक आणि बीडचे आमदार यांना सूचना केली आहे.

कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्ती साठी निधी दिला गेला आहे. जगात काही ठिकाणी कोरोना साथीची चौथी लाट देखील आली आहे . त्यामुळे आपण गाफील न राहता लसीकरण केले जावे बूस्टर डोस व विद्यार्थ्यांचे लसीकरणा मध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा व उपस्थितांना केले.

 बीड जिल्ह्याला झुकते माप द्या – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्हा हा मागासलेला म्हणून ओळखला जातो, हे मागासलेपण दूर करण्यासाठी रखडलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गासह, ऊसतोड कामगारांची आर्थिक उन्नती, शेतीला मुबलक पाणी, ग्रामीण भागातील दळण वळण अशी अनेक विधायक कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. कोविड काळात राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा व विकासाला पूरक निधी उपलब्ध करुन दिला. आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात येत असलेल्या निधीतून दर्जेदार व राजकारण विरहित कामे करून दाखवू असे यावेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

बीड जिल्हा पुणे जिल्ह्या प्रमाणे विकसित व्हावा हे आपले स्वप्न असून, यासाठी अर्थमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला निधी देताना ओंजळ मोठी करावी व जिल्ह्याला झुकते माप द्यावे, अशी विनंती पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कामकाज, कोविड व्यवस्थापन व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांची संक्षिप्त माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *