मुंबई प्रतिनिधी, दि. ०९ : वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. दरवर्षी १०० च्या इष्टांकानुसार कलावंतांची निवड समिती करते. मानधन मंजूर झालेल्या कलावंतांना श्रेणी निहाय (अ श्रेणी रु.३१५०, ब श्रेणी रु.२७००, क श्रेणी रु.२२५०) मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालालयामार्फत अदा करण्यात येते.
ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय ५० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.४८ हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमूना www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, म.गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२ या कार्यालयातही उपलब्ध असून भरलेले अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी ०२२-२२८४२६३४/७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.