बालकांचे नियमित लसीकरण करुन त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करु या!

बालकांचे विविध आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून सन 1978 मध्ये विस्तारीत लसीकरण कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आला. पुढे या कार्यक्रमाचा विस्तार शहरी भागाच्या पलीकडे झाला तेंव्हा 1985 मध्ये त्याचे नाव बदलून सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम असे संबोधण्यात आले. सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक आहे जो वार्षिक 2.67 करोड नवजात बालकांचे आणि 2.9 कोटी गर्भवती महिलांचे सेवा देण्याचे लक्ष आहे. या आरोग्याच्या निर्देशांकामुळे 5 वर्षा खालील लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास अधिक परिणामकारक ठरले आहे.

सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 12 प्रतिबंधात्मक लसी देण्यात येतात. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलीओ, गोवर, रुबेला, क्षय रोग, काविळ, मेंदूज्वर, अतिसार, श्वसनदाह, जे.ई.

राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे वरील प्रमाणे सर्व लसी एक वर्षात घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाची यशस्वीता म्हणजे दोन महत्वाचे टप्पे आहेत ज्यामुळे 2014 मध्ये पोलीओ आणि 2015 मध्ये माता आणि नवजात बालकांच्या धनुर्वाताच्या आजाराचे निर्मुलन करण्यात आले.

मिशन इंद्रधनुष्य

मिशन इंद्रधनुष्य हे भारत सरकारचे आरोग्य अभियान आहे. हे 25 डिसेंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आले. हेतू असा की, या अंतर्गत बालकांचे संपूर्ण लसीकरण 90 टक्के पर्यंत वाढविता येईल आणि ते सन 2022 पर्यंत कायम करता येईल. मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्प्यात 201 जिल्हे घेण्यात आले. यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आणि मध्य प्रदेश यातील 82 जिल्हे अंतर्भुत आहेत. आणि जवळपास 50 टक्के लसीकरण न झालेले 201 जिल्हयांची निवड करण्यात आली.

मिशन इंद्रधनुष्य ही भारतातील केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक योजना म्हणून ओळखली जाते.

गतिमान मिशन इंद्रधनुष्य

या कार्यक्रमात जिथे लसीकरणाचे काम कमी आहे आणि ज्या भागात कर्मचाऱ्यांना पोहोचणे ‍कठीण आहे, ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा ज्यांचे अंशत: लसीकरण झालेले आहे. अशा ठिकाणी लसीकरण कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने 8 आक्टोबर 2017 रोजी गतिमान मिशन इंद्रधनुष्य सुरु केले. याव्दारे 2 वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकांपर्यत आणि सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे ज्या नियमित लसीरकरण कार्यक्रमांतर्गत परावृत्त राहिल्या आहेत.

यामध्ये 2020 एैवजी डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के पेक्षा पूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी निवडक जिल्हे आणि शहरांमध्ये लसीकरण कव्हरेज सुधारण्यासाठी विषेश मोहिम राबविण्यावर भर देण्यात आला. 2030 पर्यंत टाळता येणारे बालमृत्यू टाळण्याचे हे निरंतर विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे हे धोरण आहे. हे 27 राज्यांमधील 272 जिल्हयांमध्ये आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्लॉक स्तरावर लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे, कारण जेथे पोहोचणे कठीण आहे आणि आदिवासी लोकसंख्या आहे.

देशातील 554 जिल्हयांमध्ये सहा टप्पयांमध्ये हे मिशन पुर्ण करण्यात येत आहे. ग्राम स्वराज अभियान आणि विस्तारीत ग्राम स्वराज अभियान अंतर्गत महत्वाकांक्षी जिल्हयांमध्ये प्रमुख योजनांपैकी एक म्हणूनही ती ओळखली गेली.

राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-4 च्या तुलनेत मिशन इंद्रधनुष्यच्या प्रथम दोन टप्पयांमध्ये 6.7 टक्के पूर्ण लसीकरणाचे प्रमाण वाढलेले होते. तर अलिकडे 190 जिल्हयात केलेल्या सर्व्हेक्षणात पाचव्या टप्प्यात 18.5 टक्के पुर्ण लसीकरण कव्हरेजमध्ये वाढ झालेली दिसून आली .

राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-4 (सन 2015-16) प्रमाणे पाहू जाता महाराष्ट्रातील बालकांचे एक वर्ष वयोगटात केलेले पूर्ण लसीकरण कव्हरेज 60.7 टक्के होते तर राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्व्हेक्षण-5 (सन 2019-21) प्रमाणे 83.8 टक्के आहे. गतिमान मिशन इंद्रधनुष्यच्या उद्दीष्टांप्रमाणे सन 2018 पर्यंत 90 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. सध्या आपण 2022 या वर्षात पदार्पन केलेले आहे. मात्र 90 टक्के हे उद्दीष्ट साध्य केलेले नाही.

आधी पाहिल्याप्रमाणे 1978 पासून बालकांच्या आजाराचे संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण कार्यक्रम भारतात सर्वत्र राबविण्यात येत आहे.

बालकांना होणारे 12 आजार आणि त्याचे लक्षणे

क्षय रोग- हा मायकोबॅक्टेरिया टयुबरकुलोसीस मुळे होणारा आजार आहे. हा फुप्फुसात होणारा आणि हाडे, सांधे, सांधे, आणि मेंदू या अवयवांमध्ये होत असतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला खोकताना, शिंकताना तुषार बिंदूव्दारे याचा संसर्ग होत असतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी बी.सी.जी. ही लस बाळाला एक वर्षाच्या आत दिली जाते.

कावीळ- ब- हा आजार विषाणूमुळे होतो. यात बालकांच्या यकृतावर परिणाम होतो. याचा संसर्ग बाळाच्या जन्माच्या वेळेस किंवा एक वर्षापर्यंत होतो. या आजारामुळे कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि यकृताचा सिरासीस हे आजार होतात. दुषित रक्त किंवा शारीरिक स्त्राव यामुळे हा आजार होतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी हिपॅटायटीस-ब ही लस बालकांना जन्मत: आणि एक वर्षाच्या आत 3 मात्रांमध्ये दिली जाते.

बालपक्षाघात (Poliomyelitis)- हा तीव्र सांसर्गिक आजार आहे. हा पोलीओ विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा आजार मुख्यत: 5 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. या आजाराचे विषाणू मज्जारज्जू तंत्रिकाच्या स्नायु व नियंत्रण करणाऱ्या तंत्रिकेला इजा करतात. या आजाराचे प्रतिबंध पोलीओ प्रतिबंधक लस (OPV,IPV) देऊन केला जातो.

घटसर्प- हा आजार कॉरिनेबॅक्टरियम डिप्थीरिया या जिवाणूच्या संसर्गामुळे होतो. या संसर्गात मुख्यत: घसा आणि टॉन्सीलवर परिणाम होतो. यामुळे घशात एक पडदा तयार होऊन श्वसनास अडथळा निर्माण होतो. वेळीच आरोग्य संवा न मिळाल्यास मृत्यू सुध्दा होऊ शकतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी पेंन्टावेलेन्ट लसीमध्ये घटसर्प (DPT/TD) 3 मात्रा आणि बुस्टर डोस दिला जातो.

डांग्या खेाकला- बोरडेटेला परटयुसीस या जिवाणूच्या संक्रमणाने हा आजार होत असून हा श्वसन संस्थेचा आजार आहे. हे जंतू नाक व घसा यामध्ये संक्रमीत होतात. हा तीव्र स्वरुपाचा सांसर्गिक आजार आहे. वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे बालकांना श्वसनदाह होतो. यामुळे इतर गुंतागुंत होऊन बालकांना मृत्यू सुध्दा येऊ शकतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी पेंन्टावेलेन्ट लसीमध्ये घटसर्प (DPT/TD) 3 मात्रा आणि बुस्टर डोस दिला जातो.

धनुर्वात- हा आजार क्लॉस्ट्रिडियम टेटानी या जिवाणू पासून होतो. हा जिवाणू माती मध्ये आढळतो. जखम किंवा कापलेल्या ठिकाणी माती लागल्यास या जिवाणूचा संसर्ग होतो. हे जिवाणू विष बाहेर सोडतात, त्यामुळे स्नायुंना तीव्र आकडी येते आणि ते दुखतात तसेच मृत्यू देखील येऊ शकतो. नवजात बालकातील धनुर्वात आणि प्रसूती दरम्यान होणारा धनुर्वात ही जेंव्हा कोणत्याही स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता प्रसूती केली जाते त्या क्षेत्रासाठी गंभीर समस्या आहे. बाळाच्या जन्मानंतर 3 ते 28 दिवसांच्या दरम्यान बाळ स्वाभाविक स्तनपान करित नाही , शरीर ताठ होते, झटके येतात, स्नायू आकुंचित होतात. हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार टाळण्यास गर्भवती महिलांना टी.टी/टी.डी. तसेच बालकांना डी.पी.टी. व पेंटाव्हायलेंट लस वेळापत्रकाप्रमाणे सर्व वयोगटात देऊन प्रतिबंध घालता येतो.

हेमोफिलस इन्पऱ्ल्युएन्झा टाइप बी आजार- हे जिवाणू साधारणत: बालकांच्या नाकात आणि घशात आढळतात. याचे सहा प्रकार असून हेमोफिलस इन्पऱ्ल्यूएन्झा टाइप बी किंवा Hib मुळे 90 टक्के गंभीर संसर्ग होतो. पाच वर्षाखालील मुलांमध्ये गंभीर श्वसनदाह आणि मेंदुदाह होतो. यामध्ये ताप येणे, थंडी वाटणे,खोकला येणे, श्वासोश्वास जलद होणे, छाती आत ओढली जाणे, मेंदुदाह असलेल्या मुलांत ताप, डोके दुखणे, प्रकाशाची तीव्रता, मान ताठ होणे, कधी कधी गोंधळलेल्या अवस्थेत असणे, किंवा बदललेली चेतना अशी लक्षणे दिसून येतात.

रोटा विषाणूमुळे होणारा अतिसार- हा तीव्र सांसर्गिक आजार आहे. यामुळे बालकांच्या लहान आतडयांना संसर्ग होतो. त्यामुळे बालकांना गंभीर अतिसार होतो. 3 ते 12 महिने वय असलेल्या बालकांमध्ये गंभीर शुष्कतेमुळे मृत्यू होतो. सौम्य आणि पातळ पाण्यासारखी शौच आणि उलटी होणे ही लक्षणे दिसून येतात. यामुळे जलशुष्कता होते. दु‍षित अन्न, पाणी आणि वस्तू यामुळे रोटा विषाणूचा प्रसार होतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी रोटा व्हायरस ही लस मुखावाटे दिली जाते.

न्युमोकोकल आजार- हा आजारांचा एक समुह आहे. हा आजार बॅक्टेरियम स्ट्रॅप्टोकोकस निमोनिया या जिवाणू मुळे होतो. या आजारात मोठया प्रमाणात श्वसनदाह (निमोनिया), मेंदुदाह, रक्तप्रवाहात होणारा संसर्ग, 5 वर्षाखालील बालकांमध्ये स्ट्रॅप्टोकोकस निमोनयिामुळे होणाऱ्या श्वसनदाहाचे मुख्य कारण आहे. न्युमोकोकल या आजाराची लहान बालके आणि वयस्क्‍ व्यक्तींमध्ये जोखिम अधिक असते. 5 वर्षाखालील बालकांमध्ये ज्यांचे वय 2 वर्षापेक्षा कमी आहे,ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, गरीबी, दुर्लक्षित लोकसंख्या यामध्ये प्रसाराचे प्रमाणे अधिक दिसून येते. या आजाराला प्रतिबंध करण्यास Pneumococal Conjugate Vaccine (PCV) या लसीच्या तीन मात्रा 6,14 आठवडे आणि 9 व्या महिण्यात देऊन प्रतिबंध केला जातो.

गोवर/रुबेला- हा गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. तीव्र संसर्गिक आहे. कुपोषित आणि दाटीवाटीने राहणाऱ्या मुलांमध्ये मोठया प्रमाणावर होतो. या आजारात गंभीर अतिसारामुळे होणारी जलशुष्कता, कुपोषण आणि मध्य कर्णाला सुज येणे, श्वसनदाह होणे, आंधळेपणा आणि मेंदुचा संसर्ग होऊ शकतो.

रुबेला हा मुलांमध्ये सौम्य आजार आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीला जर याचा संसर्ग झाल्यास आपोआप गर्भपात हेातो. उपजत मृत्यू होतो आणि बाळाला जन्मजात व्यंग असू शकतो. या आजारात अंगावर बारीक बारीक पुरळ दिसतात, खोकला, नाक वाहने आणि डोळे लाल दिसणे. गोवर/रुबेला ही लस एक वर्षाआतील बालकांना देऊन या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

जपानिस मेंदूज्वर- हा विषाणूमुळे होणारा आजार असून याचा मेंदूला संसर्ग होतो. राज्यातील काही विशिष्ट भागात या आजाराचा प्रसार आढळतो. हा आजारा 10 वर्षाखालील बालकांमध्ये मोठया प्रमाणावर आढळून येतो त्यामुळे हा आजार गंभीर स्वरुपाचा असून मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. अचानक येणारा तीव्र ताप, मानसिक स्थितीत बदल होणे , बेशुध्दावस्था आणि झटके येणे ही लक्षणे दिसून येतात. या विषाणूचा प्रसार डासामार्फत होतो. पक्षी , पाळीव प्राणी खास करुन डुकरांमध्ये हे विषाणू राहतात. सांसर्गिक प्राण्याला डास चावल्यास, तोच डास मनुष्याला चावल्यास हा आजार होतो. अति जोखमीच्या जिल्हयात 1 ते 15 वयोगटातील मुलांना जे.ई. ही लस दिली जाते. 9 महिणे ते 2 वर्षे या कालावधीत दोन मात्रा देऊन या आजाराचा प्रतिबंध केला जातो.

या सर्व आजारांचे गांभीर्य लक्षात घेता आजची बालक ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ आहेत. अगदी लहानपणापासूनच ते मानसिक आणि शारीरिक दृष्टया सबल असणे आवश्यक आहे. याकरिता शासकीय स्तरावरुन विविध प्रयत्न केले जात आहेत. समाजाच्या सहभागाशिवाय शासनाचे कोणतेही कार्यक्रम योग्यरित्या राबविता येणार नाहीत म्हणून समाजाने योग्य सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.

डॉ. श्रीराम गोगुलवार

प्राचार्य

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *