सातारा प्रतिनिधी, दि. १२ : सैनिक स्कूलच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाने २८५.१६ कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. यामुळे या स्कूलच्या विद्यार्थ्यांना आणखीन अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहे. या नुतनीकरणामध्ये बांधण्यात येणारी इमारतींची कामे भविष्याचा विचार करुन वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सातारा येथील सैनिक स्कूलच्या नुतनीकरण कामांचा आढावा आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे, सहायक अभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने २८५.१६ कोटी रुपये प्रास्तावित केले आहेत. यामधून प्रशासकीय इमारत, विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह, टाईप १, २, ३, ४ व ५ इमारती, रुग्णालय, वर्कशॉप व क्रीडा संकुल असे एकूण ५८५३४.०७ क्षेत्रफळाचे काम असणार आहे. सैनिक स्कूलपासून जाणाऱ्या ओढ्यामुळे भविष्यात दुर्गंधी पसरु शकते यासाठी हा ओढा बाहेरुन काढावा यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच पैशाच्या बचतीसाठी बायोगॅस प्रकल्प उभा करावा यासाठी वाया जाणारे अन्न, पालापाचोळा यांचा वापर करावा, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी केल्या.
सविस्तर नकाशे व तांत्रिक मान्यता अंदाजपत्रकाचे काम सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले सल्लागार मे. सुनिल पाटील ॲड असोसिएटस, पुणे यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे.